अमित जोशी, www.24taas.com, अहमदाबाद
गुजरातच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेस आणि मोदींमधील आरोप-प्रत्यारोपांना जोर चढलाय. विशिष्ठ समाज आणि भागांचाच विकास केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असताना, 2017 पर्यंत गुजरातमध्येच राहणार असल्याचा दावा मोदींनी केलाय. यामुळं राजकीय चर्चांना वेग आलाय.
गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारात जेव्हा काँग्रेसकडून मोदी सरकरावर तिखट हल्ला सुरु असताना, मोदींनी शह-काटशहाच्या राजकारणात नवा डावपेच टाकलाय. तिस-यांदा सत्ता मिळाली, तर 2017पर्यंत गुजरातमध्येच राहणार असल्याचं आश्वासन, मोदींनी गुजरातच्या जनतेला दिलय.
2014च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतल्या महाभारतासाठी मोदी गुजरातला कूच करतील, आणि राज्य दुस-या भाजप नेत्याच्या हातात सोपवलं जाईल. या चर्चांना थोपविण्याचा प्रयत्न मोदींकडून करण्यात येतोय. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदींना थेट लक्ष्य केलंय. काही खास विभागांचा आणि समाजाचाच विकास मोदींनी केल्याचा आरोप सोनियांनी केलाय.
या आरोप-प्रत्यारोपांतून मोदींचा किल्ला ढासळत तर चालला नाही ना, अशी शंका उपस्थित करण्याला वाव आहे.. या किल्ल्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न एका बाजूला मोदी करत असताना, दुसरीकडे काँग्रेसला मात्र गुजरातमध्ये आशेचा किरण दिसतोय.