www.24taas.com, झी मीडिया, उत्तराखंड
आभाळ फाटल्याने झालेल्या या महाप्रलयात केवळ केदारनाथचे मंदिर आणि त्यातील शिवलिंग अजूनही तसेच आहे. त्याच्या आजुबाजूचा परिसर मात्र पूर्णपणे विखरून गेलाय. त्याच्या चोहोबाजूस पसरलेले छिन्नविछिन्न देह अंगावर काटा आणतात. उत्तराखंडचे कृषिमंत्री हरक सिंग रावत यांनी पाहणी झाल्यानंतर असं सांगितलं की, आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत हेलिकॉप्टरने त्याठिकाणी उतरलो. त्याठिकाणचे दृश्य फारच विदारक होते. केदारनाथ परिसराच्या चारही बाजूस विध्वंस आणि हानीच दिसत होती.
प्रशासनाकडून बद्रिनाथ मंदिरापासून काही अंतरावर हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे साधारण २५० लोक अडकलेले आहेत. गौरीकुंडात अजून ८००० ते १०,००० लोक अडकलेले आहेत. आम्ही वृद्ध आणि आजारी लोकांना सुरक्षितस्थळी आणण्याचे काम करत आहोत. सेना आणि आयटीबीपी चे लोक बाकीच्या लोकांना दोरीच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.असे रावत म्हणाले. त्याचप्रमाणे मंत्र्यांनी अशीही माहिती दिली की, सेना आणि आयटीबीपीच्या लोकांनी आतापर्यंत २००० लोकांना वाचवले आहे.
केदारनाथजवळील उद्ध्वस्त झालेल्या रामबाडा परिसरात अधिका-यांनी एक हॅलीपॅड बनवलंय. तिथे लहान हेलिकॉप्टर उतरु शकतात. रावत यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार उद्ध्वस्त झालेल्या या छोट्या झोपड्यामध्ये अजूनही लोक थांबलेले आहेत. लोकांना खाण्याचे पॅकेटस पुरवले जात आहेत. आणि सुरक्षादल तिथे अडकलेल्या लोकांपर्यत पोहोचले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.