गाझियाबाद: हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नानंतर धर्म परिवर्तनसाठी दबाव टाकणाऱ्या लव्ह जिहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र विरोध दर्शवलाय. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
तसंच महिलांच्या सक्षमीकरणावरही भर देण्याची गरज असल्याचं गाझियाबादमधील एका कार्यक्रमात भागवत म्हणाले. लव्ह जिहादमागे सिमी आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचा मुद्दा आरएसएसचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य आणि ऑर्गनायझरमधून मांडण्यात आला आहे. रांचीमधील राष्ट्रीय शूटर तारा शाहदेवचं प्रकरण उजेडात आल्यानंतर आता विविध संघटना सक्रिय झाल्या आहेत.
दरम्यान, 'लव्ह जिहाद'वरून संघाच्या वाढत्याविरोधानं राजकारणही तापू लागलं आहे. 'राजकीय फायद्यासाठी लव्ह जिहादच्या मुद्द्याला जाणून-बुजून आरएसएसकडून हवा दिली जातेय', असा आरोप समाजवादी पक्षानं केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.