नवी दिल्ली : पीओकेमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेटणार असल्याचं बोललं जातंय. पंतप्रधान मोदी त्यांना भेटून त्यांचं अभिनंदन करणार असल्याचं बोललं जातंय.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांमध्ये पंतप्रधान त्यांच्या इतर कार्यक्रमांमधून वेळ काढून या जवानांचं कौतूक करण्यासाठी त्यांना भेटणार असल्याची माहिती आहे. नवी दिल्लीमध्ये ही भेट होऊ शकते. सर्जिकल स्ट्राईकवर पंतप्रधान मोदींनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मागच्या वर्षी भारत-म्यांमार सीमेवर उग्रवाद्यांच्या कॅम्पवर हल्ला करुन त्यांना कंठस्नान घालणाऱ्या जवानांना सुद्धा पंतप्रधान मोदी भेटले होते.
जम्मू आणि काश्मीरमध्ये इतर ऑपरेशन्स करणाऱ्या 1, 4 आणि 9 पॅरा स्पेशल फोर्सच्या जवानांना विशेष जवान म्हणून निवडलं जातं आणि सर्जिकल स्ट्राइक सारख्या कारवाईंसाठी त्यांना तयार केलं जातं. सर्जिकल स्ट्राइकच्या एक आठवड्याआधी योजना आखली जाते. संपूर्ण कारवाईमध्ये फक्त एक जवान जखमी झाला होता. कमांडोजने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं लष्कर प्रमुखांनी सुद्धा अभिनंदन केलं आहे.