हैदराबाद : आंध्र प्रदेशातील मंत्री पी. रघुनाथ रेड्डी यांनी केलेल्या दाव्यानुसार, आखाती देशांत घरकाम करण्यासाठी गेलेल्या महिलांवर अत्याचार होत आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी लक्ष घालून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी रेड्डी यांनी केली आहे.
आखाती देशातील भारतीय महिलांना तुरूंगात जीवन काढावं लागतंय, मालकांमुळे ही परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. मालकाच्या अत्याचारातून बाहेर येण्यासाठी व्हिसाचा कालावधी संपल्यामुळे, या पीडित महिलांनी भारतात परतण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी रेड्डी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून या महिलांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह धरला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यातील महिलांना आखाती देशांमध्ये दुकानातील सामानासारखं विकलं जात आहे अशा शब्दात रेड्डी यांनी महिलांची स्थितीबाबत पत्रात लिहिले आहे.
या पीडित महिलांना आवश्यक कागदपत्रे देऊन, तसेच मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून त्यांना घरी परत आणण्याच्या दृष्टीने तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भारताने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार बहरीन, कुवैत, सौदी अरब, यूएई आणि ओमान या आखाती देशांमध्ये सुमारे ६० लाख भारतीय प्रवासी राहतात. यांमध्ये भारतीय एजंटांकडून तिप्पट पगार देणाऱ्या नोकरीसाठी आपला गाव सोडून आखातात गेलेल्या महिलांचाही समावेश आहे.
गरजू महिलांच्या खाणे-पिणे, कपडे आणि राहण्याची सोय करण्यासाठी आखाती देशातील भारतीय दूतावासाला सूचना करण्यात याव्या अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.