नक्षलवाद्यांकडून वायुदलाच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरला नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडावं लागलंय. काही वेळापूर्वी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचा मृतदेह आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर घटनास्थळावर दाखल झालं होतं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 18, 2013, 11:36 PM IST

www.24taas.com, छत्तीसगड
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरला नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडावं लागलंय. काही वेळापूर्वी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचा मृतदेह आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर घटनास्थळावर दाखल झालं होतं.
नक्षलवाद्यांनी हॅलिकॉप्टरवर गोळीबार केल्यानं हॅलिकॉप्टरमध्ये असणारा वायरलेस ऑपरेटरला गोळी लागून तो गंभीर जखमी झालाय. अशा आपात्कालिन परस्थितीच हॅलिकॉप्टर जमिनीवर उतरवण्यात आलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील तेमेलवाडा गावामध्ये नक्षलवाद्यांनी छत्तीसगड सशस्त्र दलाच्या पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले तर एक गंभीर झाला होता.

शुक्रवारी पोलीस दल रोड खुला करण्याच्या कामात जुंपलं असताना नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला. यानंतर पोलिसांनीही प्रत्यूत्तर दिलं. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या बातमीनंतर जगदलपूरहून वायुसेनेचं एक हेलिकॉप्टर (एमआय १७) घटनास्थळी मदतीसाठी पाठवण्यात आलं होतं. या हेलिकॉप्टरमध्ये सात जण होते. याच हेलिकॉप्टरवर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. हेलिकॉप्टर तेमेलवाडामध्ये वेळेवर न पोहचल्यानं त्याचा शोध सुरू करण्यात आला. तब्बल दोन तासानंतर या हेलिकॉप्टरशी संपर्क शक्य झाला. हेलिकॉप्टरमधील इतर सहाही जण सुखरुप आहेत.