www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गॅस सिलिंडर पुरवणारी कंपनी किंवा वितरकावर नाखूश असलेल्या ग्राहकांना आता पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरूवातीला मुंबई, पुणे, नागपूरसह ३० शहरांमध्ये ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं घेतला आहे.
आजमितीस गॅस कंपनी किंवा वितरक बदलणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. दुसरीकडे ५ किलो वजनाचे गॅस सिलिंडर पेट्रोल पंपावर उपलब्ध करून देण्याचा निर्णयही मंत्रालयानं घेतलाय. हे सिलिंडर बाजारभावानं मिळतील. सुरूवातीला दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांत ही सुविधा उपलब्ध असेल.
पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या सिलेंडरची किंमत अनुदानित सिलेंडरपेक्षा दुप्पट असेल. त्यावर कोणतंही सरकारी अनुदान देता येणार नाही. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यांचे देशभरात १४४० पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी निवडक काही पंपावर हे सिलेंडर मिळू शकेल.
मुंबईत पाच किलो अनुदानित सिलिंडरची किंमत १६३ रुपये आहे. पेट्रोल पंपावर हाच सिलिंडर ३९६ रुपयांना मिळेल. या सिलिंडरच्या खरेदीसाठी ग्राहकांचं मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, कर्मचारी ओळखपत्र, पासपोर्ट, विद्यार्थी ओळखपत्र आदींची छायांकित प्रत ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.