आईला उठवण्याचा 'त्या' पिल्लाचा प्रयत्न निष्फळ ठरला, काळीज पिळवटून टाकणारं दृश्यं

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं... प्रत्येकाच्या जीवनात आईचं खास स्थान असतं... मग ते माणूस असो किंवा मुकं जनावर... अशाच मुक्या जनावराच्या मातृप्रेमाची घटना कोईम्बतूरमध्ये पाहायला मिळाली.

Updated: Jul 7, 2016, 08:46 AM IST
आईला उठवण्याचा 'त्या' पिल्लाचा प्रयत्न निष्फळ ठरला, काळीज पिळवटून टाकणारं दृश्यं title=

कोईम्बतूर : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं... प्रत्येकाच्या जीवनात आईचं खास स्थान असतं... मग ते माणूस असो किंवा मुकं जनावर... अशाच मुक्या जनावराच्या मातृप्रेमाची घटना कोईम्बतूरमध्ये पाहायला मिळाली.

कोईम्बतूरमधल्या नरसिपूरममध्ये काळजाचा ठोका चुकणारं आणि हृदय हेलावून टाकणारं दृष्यं पाहायला मिळालं. २० वर्षीय हत्तीणीचा आजारपणामुळं मृत्यू झाला... मात्र, तिच्या निरागस पिल्लाला आपली आई सोडून गेल्याचं मान्यच नव्हतं. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या १५ दिवसांत आत्तापर्यंत पाच हत्तींनी आपला जीव गमावलाय. 

काळीज पिळवटून टाकणारी घटना

जमिनीवर पडलेल्या आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न हत्तीणीचं पिल्लू करत होतं... काही केल्या ती उठेना म्हणून ते पिल्लू तिच्या अंगावर बसलं.. आई ऊठ ना, आई ऊठ ना अशीच जणू काही साद ते घालत होतं... काही केल्या आई उठेना म्हणून पिल्लू रडलं... पायानं हलवून पाहिली... जमिनीवर निपचित पडलेल्या आईचा कान पकडण्याचा प्रयत्न केला... काहीही कर आणि उठून माझ्याशी बोल, खेळ अशी विनवणी ते केली... पण, व्यर्थ

मात्र त्या मुक्या जीवाला काय माहित जिला आपण उठवण्याचा प्रयत्न करतोय ती आता या जगात नाही. तरीसुद्धा हे पिल्लू वारंवार तिच्याजवळ जातं राहिलं... तिच्याशी खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहीलं... या क्षणाणं अनेकांचं काळीज पिळवटून टाकलं... परंतु, आई हत्तीण काही केल्या परत आणता येणार नव्हती. 

अखेर हत्तीणीवर अंत्यसंस्कार

या मृत हत्तीणीच्या पोस्टमार्टमसाठी वनअधिकारीसुद्धा आले.. मात्र त्यांनाही या पिलानं जवळ येऊ दिलं नाही.. एक दोन नाही तर तब्बल ३६ तास हे पिल्लू आपल्या मृत आईच्या अंगावर बसून रडत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होतं. 

या हत्तीणीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जेसीबी मशिन आणली... मात्र त्या मशीनकडे धावत जात पळवण्याचाही प्रयत्न या पिल्लानं केला... अखेर या पिल्लाला काही तरी खाण्यात गुंतवत वनविभागानं या मृत हत्तीणीवर अंत्यसंस्कार केले.. 

मात्र, आपल्या आईसाठी अश्रू ढाळणाऱ्या, तिला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या हत्तीणीच्या पिल्लाचं हे मातृप्रेम पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले दिसले.