www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
`काँग्रेसचं सरकार योगगुरू रामदेव बाबांच्या मागं हात धुवून लागलं आहे. रोजच्या रोज त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलाय. शिवाय `रामदेवबाबांना अडकवण्यासाठी काँग्रेस जी ताकद लावतेय, ती ताकद त्यांनी उत्तराखंडातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी लावली असती तर त्यांचं भलं झालं असतं,` अशी तोफही मोदींनी डागली.
चार राज्यांतील निवडणुकीनंतर देहरादून इथं झालेल्या पहिल्याच सभेत मोदींनी उत्तराखंडमधील विजय बहुगुणा यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. बहुगुणा सरकारचं लक्ष्य ठरलेल्या योगगुरू रामदेवबाबांचं मोदी यांनी समर्थन केलं.
`रामदेवबाबा लोकांना श्वास घ्यायला शिकवत आहेत, पण त्यामुळं काँग्रेसचा श्वास अडकू लागला आहे,` असा चिमटा मोदींनी काढला. काँग्रेसची राज्यातील आणि केंद्रातील सर्व सरकारं लोकांपासून तुटलेली आहेत, मनानं खचलेली आहेत. देशातील जनता गरीबच रहावी, जेणेकरून आम्हाला त्यांच्यावर सत्ता गाजवता येईल, हा काँग्रेसचा कुटिल हेतू आहे, असा आरोपही मोदींनी केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.