नवी दिल्ली : घुसखोरीविरोधात जोरदार कारवाई करत भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नौशेरा सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली. पाकिस्ताननं मात्र अशाप्रकारची कोणतीही कारवाई झाली नसल्याचा कांगावा केला आहे.
पाकिस्तान सरकारकडून याबाबतचा कोणताही रिपोर्ट आलेला नाही त्यामुळे स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात काहीच अर्थ नसल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी दिली आहे.
खोऱ्यातला बर्फ वितळत असल्यामुळे या काळात घुसखोरीचे प्रकार दरवर्षी वाढतात. या घुसखोरीला मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैनिक कव्हरिंग फायर देतात. अशाच एका गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. या हल्ल्याचा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे.