`बटाटावडा` आणि `सूप` आम्ही काढणार नाहीत

महाराष्ट्रात काका-पुतण्याचं दूर जाणं तसं जनतेला वेगळं आणि आश्चर्यकारक वाटत नाही. राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दूर जातांना जनतेनं पाहिलं आहे.

Updated: Apr 7, 2014, 12:37 PM IST

www.24taas.com, विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव
महाराष्ट्रात काका-पुतण्याचं दूर जाणं तसं जनतेला वेगळं आणि आश्चर्यकारक वाटत नाही. राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दूर जातांना जनतेनं पाहिलं आहे.
मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यात असं काही होईल का?, हा जनतेचा उत्सुकतेचा विषय आहे.
मात्र शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी असं काहीही होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अजित दादांचा आणि माझा शेवटचा श्वास जाईल, परंतु आमच्यात कधी भांडण होणार नाही.
आम्ही ना कधी वडिलांना दिलेला बटाटावडा काढू ना सूप काढू. आम्ही सुसंस्कृत घरातील आहोत, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज आणि उद्धव यांचे नाव न घेता लगावला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्या प्रचारार्थ येथील बलराम व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
ज्या दिवशी पैसे खर्च करून लढण्याची वेळ येईल. त्या दिवशी मी राजकारण सोडून देईन, असा निश्चयही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त यावेळी व्यक्त केला.
नऊवारी साडीवाली सहावारीवर आली. आता ती पंजाबी ड्रेसवर आली आहे. पंजाबी ड्रेसवाली आज पँट घालू लागली आहे, याकडे लक्ष वेधून हे सामाजिक परिवर्तन आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी मांडले.
इतर राज्यांमधून नेते येतात. त्यांना येथील परिस्थिती काही माहीत नसते. लोक भाषण लिहून देतात. आणि ते भाषण करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
आमचे सर्व खासदार काय बोलले, किती प्रश्न विचारले हे शरद पवार स्वत: लक्ष ठेवून असतात, असेही सुळे यांनी नमूद केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.