राजना टोला, लायकी नसताना `सुपा`एवढे दिले - शिवसेना

बाळासाहेब लाखोंचे पोशिंदे होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या पोटाची भाषा केली. ज्यांना लायकी नसताना `सुपा`एवढे दिले, ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सुपाचे बिल जाहीर सभांतून फडकवतात. हा निलाजरेपणाच नाही काय?, असा खरमरीत अग्रलेख `सामना` या शिवसेनेच्या मुखमत्रात लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार चिमटा काढला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 5, 2014, 01:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लाखोंचे पोशिंदे होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या पोटाची भाषा केली. ज्यांना लायकी नसताना `सुपा`एवढे दिले, ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सुपाचे बिल जाहीर सभांतून फडकवतात. हा निलाजरेपणाच नाही काय?, असा खरमरीत अग्रलेख `सामना` या शिवसेनेच्या मुखपत्रात लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार चिमटा काढला आहे.
बुखारींची भाऊबंदकी तत्त्वाची आणि चिकन सुपवाल्यांची स्वार्थाची आहे असे वाटते. शिवसेना बाळासाहेबांनी आखून, ठोकून दिलेल्या मार्गावरूनच निघाली आहे. या मार्गावरून जाताना पाय घसरला असेल तर आमचा कान धरण्याचा अधिकार जनतेला आहे. आम्हास जाब विचारण्याचा अधिकार शिवसैनिकांना आहे, पण ज्यांचे `बेचव वडे` तळण्याआधी कढईतच फुटले आहेत त्यांच्याकडे ना आचार ना विचार. आम्हाला निवडणुका शांतपणे पार पाडायच्या आहेत आणि मुद्यांवर लढायचे आहे, अस स्पष्ट बजावले आहे. तुमची लायकी नाही, असे राज ठाकरेंना लेखणीतून फटकारले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पापांवर आणि अघोरी कारभारांवर कोरडे ओढीत आम्ही रान पेटविले आहे, पण वडे आणि चिकन सुपवाल्यांना मात्र या वडवानलावर पाणी ओतून जणू काँग्रेस-राष्ट्रवादीस मदत करायची आहे. अर्थात त्यासाठी शिवसैनिकांवर कुणी धोंडे फेकणार असतील तर त्या प्रत्येक धोंड्याची जबर किंमत धोंडे फेकणा-यांना मोजावी लागेल. मराठी तरुणांना आपापसात लढवून काँग्रेस-राष्ट्रवादीचे सुल्तान `बहोत खूब... बहोत खूब` म्हणून आनंदाने टाळ्या वाजवीत आहेत. शिवसैनिक त्यांच्यावरील हल्ले परतवायला आणि हल्लेखोरांची झुंडशाही मोडून काढायला समर्थ आहेत, असा स्पष्ट इशाराही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
शिवसेनेची विजयी घोडदौद रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने रचलेला हा सापळा असल्यानेच मनगटात चेव असूनही आमचे शिवसैनिक संयमाने वागत आहेत. त्यांच्या संयमाची कुणी परीक्षा घेऊ नये. तुमच्या भाऊबंधकीचे खेळ तुमच्यापाशी. आम्ही `भावबंधन`आणि `शिवबंधन`वाले ! असे उद्धव यांनी संपादकीयमध्ये म्हटले आहे. यावर आता राज काय उत्तर देतात याकडे लक्ष आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा होत आहे. या अग्रलेखाला काय उत्तर देणार म्हणून राज ठाकरेंच्या भाषणाकडे सा-यांचं लक्ष लागले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.