www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`द वीक` या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या दाव्यानुसार, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्नीला रामदेवबाबांच्या आश्रमात पोहचवलंय. वडोदरामध्ये उमेदवारी अर्ज भरताना आपल्या पत्नीचा पहिल्यांदाच उल्लेख केल्यानंतर मोदींनी पत्नी जसोदाबेन यांना तातडीनं त्यांच्या राहत्या घरातून हलवल्याचं यामध्ये म्हटलं गेलंय.
विश्व हिंदू परिषदेच्या आणि शंकराचार्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं, `द वीक`नं हा दावा केलाय. जशोदाबेन या कोणत्याही तिर्थयात्रेला गेल्या नसून मोदींनीच आपले काही कार्यकर्ते धडून आपल्या पत्नीला - जशोदाबेन यांना ऋषिकेशमध्ये बाबा रामदेवांच्या आश्रमात पोहचवलंय. आता सध्याही मोदींची पत्नी याच आश्रमात आहे, असं या वृत्तात म्हटलं गेलंय.
१३ एप्रिल रोजी मोदींनी आपल्या उमेदवारी अर्जात जसोदाबेन यांचा आपली पत्नी म्हणून पहिल्यांदाच जाहीर स्वीकार केला. यानंतर काही हिंदू कार्यकर्ते आणि सुरक्षा अधिकारी तीर्थयात्रेकरूंच्या वेशात ब्राह्मणवाडा गावातील जसोदाबेन यांच्या घरी दाखल झाले. यावेळी, तीन एसयूव्ही गाड्या जसोदाबेन यांच्या घरासमोर उभ्या होत्या. त्यांनी जसोदाबेन यांना चार धामच्या यात्रेवर जाण्याची गळ घातली, असं या मॅगझीनच्या २७ एप्रिल रोजी येणाऱ्या अंकातील एका विशेष रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय.
जसोदाबेन यांना गाडीमध्ये घालून अहमदाबादला आणलं गेलं आणि तिथून एका चार्टर्ड विमानानं उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या सीमेवर स्थित औरंगाबाद या स्थळावर धाडलं गेलं. त्यानंतर पुन्हा गाडीमध्ये घालून त्यांना ऋषिकेशमधल्या नीलकंठ महादेव मंदिरानजीक एका टेकडीवर स्थित बाबा रामदेव यांच्या आश्रमात पोहचवलं गेलं. बातमीनुसार, आश्रमातील लोकांनीही १३ तारखेला या आश्रमात एक महिला दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
रिपोर्टनुसार, जसोदाबेन गुजरातच्या सुरक्षा दलांच्या उच्च अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जसोदाबेन यांना कदाचित याचीही माहिती नाही की सध्या त्या ज्या लोकांसोबत आहेत ते यात्रेकरू नाहीत तर ते लोक आहेत ज्यांच्यावर जसोदाबेन सार्वजनिक रुपात येऊ न देण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
माहितीनुसार, या सगळ्या गोष्टींचा किंवा जसोदाबेन यांचा मोदींनी इतका प्रदीर्घ काळ आपली पत्नी म्हणूनही स्वीकार न करण्याचा जसोदाबेन यांच्या कुटुंबीयांची काहीही तक्रार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.