सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे. बीड जिल्ह्यात महादेव अॅपच्या माध्यमातून घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात राजकीय आकाचा सुद्धा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत केली आहे.
- बीडचं महादेव अॅप घोटाळा कनेक्शन
- 'महादेव अॅप घोटाळ्यात राजकीय 'आका'चा सहभाग'
- सुरेश धसांचा आरोप, महाराष्ट्रात खळबळ
महादेव बेटींग अॅप पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या महादेव अॅपचं बीडचं राजकीय कनेक्शन असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला आहे. परळीमध्ये महादेव बेटिंग अॅपशी संबंधित एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
महादेव बेटींग अॅपच्या माध्यमातून झालेल्या या घोटाळ्याच्या प्रकरणात दोन पोलिसांचा समावेश असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बीडमधील या घोटाळ्याचा तपास केल्यास त्याचं कनेक्शन मलेशियापर्यंत जाणार आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा संपूर्ण तपास करण्याची आवश्यकता असल्याचंही धसांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या त्याच्यामागे आकाच आहे. याच आकांनी अनेक ठिकाणी शेतक-यांवर दबाव टाकून शेतजमीन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे महादेव अॅप घोटाळ्यामागे देखील हाच आका असल्याचा मोठा आरोपही त्यांनी केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत. असं असतानाच महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून बीडमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे धसांच्या या आरोपाकडे सरकार कश्याप्रकारे लक्ष देते, हे पाहणे गरजेचं आहे..