www.24taas.com
सारणाचे साहित्य - २ मोठया वाटया नारळाचे ओले खोबरे (एक मोठा नारळ) १ वाटी साखर किंवा गूळ, ५-६ वेलदोडयांची पूड, १ टेबल चमचा बेदाणा, २-३ कुस्करलेले पेढे.
कवचाचे साहित्य - २ फुलपात्रे तांदुळाचे पीठ (तांदुळ धुवून, वाळवून, दळून आणावेत) २ चमचे पातळ डालडा, अर्धा चमचा मीठ.
कृती - ओले खोबरे व साखर एकत्र करून अगदी मिनीटभर गॅसवर ठेवून ढवळावे, साखर वा गूळ विरघळेतोवरच उतरावे, नंतर त्यात वेलदोडयांची पूड, बेदाणे व कुस्करलेले पेढे घालून सारण करावे. जरा जाड बुडाच्या पातेल्यात २ फुलपात्रे पाणी ठेवावे. पाण्यातच पातळ डालडा व मीठ घालावे व पाण्याला उकळी आली की त्यात तांदुळाचे पीठ वैरावे, उलाथण्याच्या टोकाने ढवळावे व झाकण ठेवावे. मंदाग्नीवर चांगली वाफ येऊ द्यावी.
नंतर पातेले खाली उतरवून घ्यावे व झाकण ठेवावे. २-४ मिनिटांनी ह्यातली थोडीशी उकड परातीत काढून हाताला थोडे तेल व पाणी लावून ती मळून घ्यावीख् पाणी थोडेसेच वापरावे, नंतर मोठया लिंबाएवढया उकडीच्या गोळयाचा वाटीसारखा आकार करून त्यात वरील नारळाचे सारण भरून, मुखर्या करून मोदक बंद करावेत,
असे ५-६ मोदक तयार झाले की मोदक पात्रात चाळणीवर एक घट्ट पिळलेले ओले फडके पसरून त्यावर मावतील तेवढे मोदक (फक्त मोदकाची खालची बाजू) पाण्यात जरा बुडवून वाफवण्यासाठी ठेवावेत. मोदकपात्रातील पाण्याला उकळी आल्यापासून १० मिनिटांनी मोदक बाहेर काढावेत.