पुण्याचं मानचिन्ह लांडगा की जावडी मांजर?

पुण्याचं मानचिन्ह कुठलं, लांडगा की जावडी मांजर…? गंमत मुळीच नाही, लवकरच या प्रश्नाचा निकाल लागणार आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता …तर मोर . भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता… तर वाघ. राष्ट्रीय फुल, कमळ. तर मग पुण्याची अशी स्वतंत्र मानचिन्ह का असू नयेत ?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 4, 2014, 09:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
सध्या व्हॉ़टसअपवर पुणेरी विनोदही चांगलेच हिट होतायत.....कारण पुणं म्हटलं की काहीतरी वेगळं हवंच..... आता आपले राष्ट्रीय प्राणी, पक्षी ठरलेले असताना, पुण्याच्या लोकांना मात्र पुण्याचे वेगळे पक्षी आणि प्राणी असावेत, असं वाटतंय..... आणि त्यासाठी खटाटोप सुरू आहे....
पुण्याचं मानचिन्ह कुठलं, लांडगा की जावडी मांजर…? गंमत मुळीच नाही, लवकरच या प्रश्नाचा निकाल लागणार आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता …तर मोर . भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता… तर वाघ. राष्ट्रीय फुल कमळ. तर मग पुण्याची अशी स्वतंत्र मानचिन्ह का असू नयेत ?
जरा थांबा पुणे शहरालाही लवकरच नैसर्गिक मानचिन्ह लाभणार आहेत. पुण्याचा प्राणी, पुण्याचा पक्षी, पुण्याचा कीटक, इतकंच नव्हे तर पुण्याचा विषाणू कुठला, हे ठरवण्यासाठीची निवड प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यासाठी २० विभागांची यादी तयार करण्यात आलीय. त्या प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी २ नामांकनं देण्यात आली आहेत. पुण्यातल्या बायोस्पिअर, वनविभाग आणि इंद्रधनुष्य पर्यावरण संस्थेच्यावतीनं हा उपक्रम हाती घेण्यात आलाय.
पर्यावरण अभ्यासकांच्या चर्चेतून २० विभागांसाठी प्रत्येकी २ नावं निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, सस्तन प्राणी - लांडगा विरुद्ध जावडी मांजर , पक्षी - चित्रबकाल विरुद्ध शृंगी घुबड, उभयचर - वाघ्या बेडूक विरुद्ध बेडूक , अष्टपाद - स्वाक्षरी कोळी विरुद्ध सिंहगड विंचू , यासह जीवाणू, विषाणू, बुरशी यांच्यामध्येही वेगवेगळ्या नावांची चुरस आहे.
अंतिम टप्प्यातल्या मानांकनासाठी अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात येणार आहेत. त्यामध्ये निवडण्यात आलेली मानांकनं प्रशासकीय मान्यतेसाठी वन्यजीव महामंडळाकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर खास पुण्याची ही मानचिन्हं निश्चित होणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.