www.24taas.com, पुणे
रेल्वे.. दोन गावांना, शहरांना जोडणारी...कोट्यवधी लोकांना एकडून तिकडे पोहोचवणारी.. मालाची वाहतूक करणारी... मात्र दौंडची ट्रेन मात्र वेगळी आहे.ही ट्रेन ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलीय. ही आहे दौंडची मिल्क ट्रेन महाराष्ट्रातून दिल्लीकरांना दूध पुरवते.
मिल्क ट्रेन महाराष्ट्रातलं दूध दिल्लीपर्यंत पोहोचवते. पुण्यातल्या दौंडमधून सुटणाऱ्या या ट्रेनच्या एका डब्यात तब्बल ४० हजार लीटर दूध भरण्यात येतं. म्हणजे सुमारे ६ लाख लीटर दूध दिल्लीला जातं. पुणे, सोलापूर, सातारा आणि अहमदनगर या चार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून हे दूध गोळा होतं. दौंडमधून मिल्क ट्रेन सुटली की २८ ते ३० तासांनंतर ती दिल्लीला पोहोचते. महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत पोहोचणाऱ्या या दुधाचा प्रवास जितका रोमांचकारी आहे. तितकाच धाडसी होता हा निर्णयआणि हे धाडस दाखवलं सातारा जिल्ह्यातल्या फलटणच्या स्वराज संस्थेनं....
महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत दूध जाताना ते खराब होऊ नये, त्यासाठी विशिष्ट पद्धतीनं कॅन्सची आणि टँकर्सची रचना करण्यात आली आहे. दुधाचं तापमान 2.5 ते 4 डिग्री दरम्यान राखलं जातं. दूधाच्या या वाहतुकीमध्ये रेल्वेचाही मोठा वाटा आहे.
याआधी रस्त्यानं दूध पाठवलं जायचं, त्यासाठी 3 दिवस लागायचे. पण ट्रेन हेच दूध दीड दिवसांत पोहोचवते. त्यामुळे शेतक-यांसाठी ही ट्रेन फायदेशीर ठरलीय. या ट्रेनमधून आतापर्यंत दिल्लीला पोहोचवण्यात आलेल्या दुधात दोष आढळलेला नाही. सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही मिल्क ट्रेन लवकरच आठवड्यातून दोनदा धावणार आहे.