www.24taas.com, मुंबई
तब्बल १५ वर्षांनी कम बॅक करणाऱ्या श्रीदेवीने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने बॉक्स ऑफिसवर कमाल केलीय. कम बॅक करणाऱ्या इतर हिरोइन्सप्रमाणे गाजावाजा न करता श्रीदेवीने शशी या पात्राला पूर्ण न्याय दिलाय. श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट पाहताना असं एकदाही वाटत नाही की तिने एवढ्या मोठ्या गॅपनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.
इंग्लिश विंग्लिश या चित्रपटात मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन ‘शशी’ या गृहीणीची कथा आहे. शशी स्वतः दाक्षिणात्य असून ती एका महाराष्ट्रीयन फॅमेलीत लग्न करून येते. शशीचा पती ऑफिस मध्ये मोठी हुद्द्यावर काम करत असतो. मुलंही चांगल्या शाळेत शिकत असतात. शशीचा संपूर्ण वेळ तिच्या घरातल्या मंडळींचं काम संभाळण्यात आणि आवरा वरीत जात असतो. सकाळ पासून ते रात्रीपर्यत ती त्यांची हौसमौज पुरवत असते. कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आवडीनिवडींकडे शशी दूर्लक्ष करते. आपण या घराचा पाया आहोत त्यामुळे आपल्याला नेहमी घरकामात बुडून राहावं लागेल असा तिचा समज असतो.
पण शशी साधी गृहीणी असल्याने, फॅशनेबल नसल्याने आणि मुख्य म्हणजे तिला इंग्लिश येत नसल्याने तिच्या पती- मुलांमध्ये ती चेष्टेचा विषय बनते. काही कामानिमित्त शशीच्या नवऱ्याची अमेरिकत बदली होते. शशीला नेहमी आपल्या कार्याला कौतुकाची दाद आपल्या माणसांकडून मिळावी अशी अपेक्षा असते. अचानक तिच्या आयुष्याला कलाटणी येणारा प्रसंग येतो आणि ती स्वतःला बदलण्याचा निर्णय घेते. शशी इंग्लिश शिकण्यासाठी अमेरिकेत क्लासेस लावते. इंग्रजी शिकायला लागल्यावर सशीमध्ये कसं परिवर्तन घडून येऊ लागतं, याचं चित्रण या सिनेमात उत्तम प्रकारे केलंय. सिनेमात कुठलाही अतिरंजीत प्रसंग न दाखवता नैसर्गिक गोष्टींमुळे चित्रपट मनाला भिडतो. शशीची भूमिका पाहताना अनेकांना आपल्या आईची छबी नक्कीच डोळ्यांसमोर येईल.
चित्रपटाचं संगीत अमीत त्रिवेदीने दिले असून गीतं स्वानंद किरकिरे यांनी लिहिली आहेत. ‘नवराई माझी..’ हे गाणं सध्या सगळीकडेच गाजत आहे. दिग्दर्शिका गौरी शिंदेचे यांच्या दिग्दर्शनाचे तर करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पहिल्याच सिनेमात त्यांनी बाजी मारली आहे. अर्थात, या सिनेमाचं प्रमुख आकर्षण श्रीदेवीच असून तिने आपलं काम आपल्या १५ वर्षांपूर्वीच्याच सहजतेनं केलंय. ती या सिनेमाची स्टार आहे, यात काही शंकाच नाही.
नेहमी रिलीज होण्याऱ्या डझनभर सिनेमांच्या तुलनेत हा सिनेमा अगदी वेगळा आणि आनंद देणारा आहे. यात खूप काही घडत-बिघडत नाही. पण तरीही जे काही समोर घडत असतं ते सरळ हृदयात ठाण मांडून बसतं. इच्छाशक्तीच्या जोरावर सामान्य व्यक्तीही आपलं आयुष्य बदलू शकते, याची जाणीव सिनेमा बघताना होते.