Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मतदानाचा दिवस उजाडण्यापूर्वी सर्व नेते आणि पक्षश्रेष्ठी सध्या प्रचारासाठी दिवसरात्र एक करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी सभांचं आयोजन केलं जात आहे.
20 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचणार असून, याच दिवशी उमेदवारांचं आणि पर्यायी राज्याचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. ज्यानंतर पुन्हा राज्यात राजकीय समीकरणांना वेग येताना दिसेल. तत्पूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत नेमकं बाजी कोण मारणार, याविषयीचा पहिला अंदाज आणि त्यासंदर्भातील पहिली आकडेवारी नुकतीच समोक आली आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीआधी करण्यात आलेल्या मॅटराईज सर्वेक्षणानुसार राज्यात भाजप नेतृत्त्वाअंतर्गत येणाऱ्या महायुतीच्या वाट्याला स्पष्ट बहुमत जात असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली आहे. आएएनएस मॅटराईजच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला विधानसभा निवडणुकीत 145 ते 165 जागांवर विजय मिळू शकतो. तर, मविआला 106 ते 126 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.
एकूण मताधिक्याचं म्हणावं तर, महायुतीला 47 टक्के मताधिक्य मिळण्याचा अंदाज असून, मविआच्या वाट्याला 41 टक्के मतं जाण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणातील आकडेवारी पाहता भाजपला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि ठाण्यासह कोकणातही मोठा विजय मिळ्याची शक्यता आहे. मतदारांचा एकूण कल पाहता भाजपच्या वाट्याला अनुक्रमे 48, 48 आणि 52 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
BJP-led Mahayuti set to return to power in Maharashtra, says Matrize survey pic.twitter.com/p3A4345YUT
— IANS (@ians_india) November 10, 2024
राहिला प्रश्न मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचा तर, सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदासाठीचा लोकप्रिय उमेदवार म्हणून गृहित धरलं जात आहे. साधारम 40 टक्के मतदारांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून समर्थन दिलं असून, उद्धव ठाकरे यांना 21 टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना 19 टक्के मतदारांनी या पदासाठी पसंती दर्शवली आहे.