www.24taas.com, मुंबई
पाकिस्तानची घुसखोरी वाढत चालली आहे. मात्र, गृहमंत्री सांगत आहेत की, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळल्याने संबंध सुधारतील. आता हे काँग्रेसचे मंत्री कसाब आणि अफजलगुरुला मांडीवर घेऊन क्रिकेटचे सामने पाहतील, इतका निर्लज्जपणा यांच्या अंगात भिनलेला आहे, अशी तोफ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट मालिकेवरुन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर डागली.
बाळासाहेबांनी दिवाळीनिमीत्त `दैनिक सामना`ला दिलेल्या मुलाखतीत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, `माझी प्रकृती बरी नसली तरी देशाची प्रकृती जास्त बिघडली आहे. देशाला काँग्रेसरुपी कॅन्सरने ग्रासले आहे. सारा देश सडला आहे.`
भ्रष्टाचाराविरुद्ध, महागाईविरुद्ध, स्वीस बँकेतील काळ्या पैशांविरुद्ध नरडी गरम करूनही सरकारला त्याचे काही पडले नाही. पाकिस्तानची घुसखोरी आणि दहशतवाद वाढतच आहे. मात्र पाकिस्तानशी क्रिकेट खेळल्यामुळे सर्व प्रश्ना सुटतील असे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेच सांगत असल्याने कसाब, अफझल गुरूने तुरुंगात मिळणाऱ्या बिर्याणीबरोबर आता पाकिस्तानबरोबर होणार्यान क्रिकेट मॅचचे तिकीट गृहमंत्र्यांकडे मागितले असेल आणि पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी काँग्रेसचे मंत्री कसाब आणि अफझल गुरूला मांडीवर बसवून क्रिकेटचे सामने पाहतील, इतका निर्लज्जपणा आमच्या राज्यकर्त्यांच्या अंगात भिनलेला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
मराठी बांधव आणि शिवसैनिकांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. माझ्या प्रकृतीस लवकरच आराम पडणार आहे असे सांगत त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.