www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या अनावश्यक वक्तव्याची मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवरून कळवले आहे.
काल या संदर्भात वर्धात बोलताना शरद पवार यांनी कानावर हात ठेवले होते. मला हे प्रकरण माहिती नाही, मी ते वक्तव्य बघितल नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. मात्र, रात्री, १ च्या सुमारास शरद पवार यांनी ट्विट करून अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांच्या केलेल्या थट्टेची माफी मागितली आहे.
`झी २४ तास`चा दणका: अजित पवारांचा माफीनामा
दुष्काळ आणि लोडशेडींग समस्येची शिवराळ भाषेत टर उडवणा-या अजित पवारांनी अखेर माफी मागितलीये. झी 24 तासच्या दणक्यानंतर अजित पवारांच्या कार्यालयाकडून माफीपत्र काढण्यात आलंय.
राज्याच्या दुष्काळी भागातील जनतेला पाणी, जनावरांना चारा आणि विद्यार्त्यांना शुल्कमाफीसह सर्व आवश्य ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठीचे प्रयत्न अधिक जोमाने सुरु राहातील. इंदापूर येथील सभेतील वक्तव्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल जनतेची माफी मागत असल्याचं आपल्या माफीनाम्यात अजित पवारांनी म्हटलं आहे. आपलं वक्तव्य दुष्काळग्रस्तांसाठी नव्हतं. तरीही ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी विनम्रपणे माफी मागत आहे, असंही माफीपत्रात नमुद केलं आहे.
इंदापूरच्या एका कार्यक्रमात अजित पवारांचा तोल सुटला आणि ते भलतचं बरळले होते. पाणीच नाही तर धरणात सोडणार कोठून? मुतता काय तिथं. बरं पाणी प्यायला मिळत मिळत नाही, तर लघवीलाही होईना? असं अत्यंत अश्लाघ्य विधान अजित पवारांनी केलं होतं. तसंच लोडशेडिंगबद्दलही अत्यंत निर्लज्ज आणि कमरेखालचं विधान अजित पवारांनी केलं होतं.