विश्रांतीची मीच मागणी केली - सेहवाग

आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी विश्रांती देण्याची विनंती मीच निवड समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली होती, अशी माहिती सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने गुरुवारी दिली. बीसीसीआयचे न ऐकल्याने भारतीय संघातून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सेहवागने ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बांगलादेश दौऱ्यासाठी संघात पुनरागमन करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

Updated: Mar 2, 2012, 10:55 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी विश्रांती देण्याची विनंती  मीच निवड समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली होती, अशी माहिती  सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने गुरुवारी दिली. बीसीसीआयचे न ऐकल्याने भारतीय संघातून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सेहवागने ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बांगलादेश दौऱ्यासाठी संघात पुनरागमन करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

बुधवारी संघ जाहीर झाल्यानंतर सेहवागला संघातून का वगळण्यात आले, या प्रश्नावर निवड समितीचे अध्यक्ष श्रीकांतही भडकले होते. सेहवागला वगळले नसून, केवळ विश्रांती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सेहवागला संघातून वगळण्यामागचे त्याने बीसीसीआयच्या निर्णयाला दर्शविलेला विरोध, हे एकमेव कारण मानण्यात येत आहे.

निवड समितीच्या बैठकीपूर्वी भारतीय संघाचे फिजिओ इव्हान स्पिचली यांनी आपला अहवाल सादर केला होता. त्यात वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांना विश्रांती देण्याचे सुचविण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर सेहवाग विश्रांती देण्याची मागणी करीत असल्याचे कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी निवड समितीला सांगितले होते. त्यामुळे निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी सेहवागची भेट घेतली. या वेळी त्यानेही विश्रांतीची मागणी केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान  कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यामध्ये वाद असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर बीसीसीआयने यामध्ये हस्तक्षेप केला. दोघांची पत्रकार परिषद घेण्यास सांगितले होते. मात्र, सेहवागने  उपस्थित न राहता धोनी एकटाच पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. त्यामुळे बीसीसीआय सेहवागवर नाराज होते.