www.24taas.com, नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत एकमेव ट्वेंटी-२० सामना होणार आहे. भारतीय संघात रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ ३० मार्चला हा ट्वेंटी २० खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय नागरिक स्थायिक झाल्याच्या घटनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने हा सामना होत आहे. या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस याचा सन्मान करण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ २८ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेस रवाना होईल. या सामन्याआधी भारतीय संघ आशिया करंडक स्पर्धेत खेळणार आहे.
सेहवाग आऊट
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील एकमेव टी-20 सामन्यासाठी वीरेंद्र सेहवागला वगळण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर सेहवागला आशिया करंडक स्पर्धेसाठी वगळण्यात आले. वन-डे संघातील स्थान गमावल्यानंतर टी-20 साठीही त्याला संघाबाहेरच ठेवण्यात आले. उथप्पाने विजय हजारे करंडक स्पर्धेत दोन शतके काढली. त्यामुळे त्याचा समावेश झाला.
भारतीय संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली (उपकर्णधार), रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर, रोहित शर्मा, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, प्रवीण कुमार, विनय कुमार, राहुल शर्मा, युसूफ पठाण, इरफान पठाण, मनोज तिवारी.