‘केस’ स्टडी

केसांचं गळणं थांबवण्याच्या डॉक्टरांनी दिल्यात काही टिप्स झी 24 तासच्या वाचकांसाठी.

Updated: Sep 26, 2011, 10:17 AM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसण्यात केसांचा वाटा खूप मोठा आहे.  तरुण वयातच केस गळायला सुरूवात झाली की वय झाल्यासारखं वाटू लागतं. म्हणूनच केसांचा हा अनमोल ठेवा वाचवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो. केसांचं गळणं थांबवण्याच्या डॉक्टरांनी दिल्यात काही टिप्स झी 24 तासच्या वाचकांसाठी.

नियमितपणे केसांची काळजी घ्या. घाम केसांच्या मुळांशी जमा होऊन तो केसांसाठी त्रासदायक ठरतो. हे टाळण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोनदा तरी केस धुवावेत. (डोक्यावरून नहावे)

डोक्यात होणारा कोंडा ही आणखी एक केसांशी संबंधित समस्या. डोक्यात कोंडा झाल्यामुले केस निर्जीव होवून गळायला लागतात. ही समस्या टाळण्यासाठी आधी केसांनी चापून चोपून तेल लावा. आणि त्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने केसांना वाफारा द्या. यामुळे केसांमधला कोंडा निघून जाईल.

वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून घ्या आणि गार झाल्यावर केसांना लावा. आठवड्यातून निदान एकदा तरी हे करा. यामुळे केस मजबूत होतील.

तीन चमचे डाळीच्या पिठात दीड ग्लास पाणी घालून त्याचा लेप केसांवर अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा. केस वाळल्यावर ते नीट झटकून घ्या.  यामुळे केसांमध्ये अडकलेले बेसनाचे कण निघून जातील आणि केस चमकदार दिसायला लागतील.

केस कधीही कडकडीत गरम पाण्याने धुवू नका. तसंच, कधी केस खसाखसा घासून पुसू नका. केस वाळवण्यासाठी खरखरीत टॉवेल न वापरता, मऊ टॉवेल वापरा. डोक्यावर टॉवेल गुंडाळून केसांना अलगद पुसून केस वाळवले पाहिजेत.

या टिप्स वापरुन पहा. याने तुमचे केस मजबूत तर होतीलच, पण, आकर्षक आणि चमकदारही दिसायला लागतील.