हायकमांडच्या आदेशानुसार दोन्ही काँग्रेसच्या प्रमुखांनी राज्यात एकत्र निवडणूक लढवण्याची भाषा केली असली तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोन्ही पक्षात बिघाडीच होण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि ठाण्यासह इतर ठिकाणी आघाडी करण्यास राष्ट्रवादी इच्छुक असल्याचं दिसतंय.
पुण्यात पंधरा वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवून गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप-शिवसेनेच्या पाठिंब्यावर महापालिकेत सत्ता मिळवली होती. गेल्या निवडणुकीत सुरेश कलमाडींची पॉवर काँग्रेससोबत असतानाही राष्ठ्रवादीनं हा चमत्कार केला होता. आता तर कलमाडी तिहारच्या तुरूंगात आहेत. कलमाडींची अनुपस्थिती आणि त्यामुळं शहर काँग्रेसमध्ये निर्माण झालेली दुफळी याचा फायदा घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. हर्षवर्धन पाटील आणि पतंगराव कदम पुण्यात आगामी निवडणुकीत काँग्रेसचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे.
अजित पवारांचं आणि या दोन नेत्यांचं सख्य अख्या महाराष्ट्राला माहित आहे. दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्येही टोकाचे मतभेद आहेत. तसंच दोन्ही पक्षांचा आपलीच ताकद जास्त असल्याचा दावा आहे. दोन्ही पक्षांत आघाडी झाली तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन त्याचा फायदा युतीला किंवा मनसेला होईल, अशी भीती दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना वाटतीय. त्यामुळं पुण्यात आघाडी जवळपास अशक्यच आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळं ताकद असताना काँग्रेसला सोबत घेण्यात काय हाशील अशीही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला फरफटत नेतात आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करतात असा काँग्रेसजनांचा आरोप आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आघाडीसाठी इच्छुक नाहीत.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि अमरावती वगळता मुंबई आणि ठाण्यासह इतर ठिकाणी आघाडी करण्यास राष्ट्रवादी इच्छुक असल्याचं दिसतंय. जिथं पक्षाची ताकद आहे तिथं आघाडी नको आणि फारशी ताकद नसलेल्या ठिकाणी आघाडी करु अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या फायद्याच्या गणिताला काँग्रेस कशी उत्तर देते हे पाहवं लागेल. आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी दोन्ही पक्षांची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्येच कुठे आघीडी आणि कुठे बिघाडी याचं चित्र स्पष्ट होणार आहे.