येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अखेर अटक

राणा कपूर यांच्या समुद्र महल या वरळीतील घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी 'ईडी'च्या हाती काही कागदपत्रे लागली आहेत.

Updated: Mar 8, 2020, 07:22 AM IST
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अखेर अटक title=

मुंबई: कर्जवाटप व आर्थिक गैरव्यहारप्रकरणी निर्बंध लादण्यात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर काल (रविवारी) त्यांना चौकशीसाठी 'ईडी'च्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. तब्बल ३० तास त्यांची कसून चौकशी झाली. रविवारी पहाटेपर्यंच ही चौकशी सुरु होती. यानंतर अधिक तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली. आज सकाळी ११ वाजता 'ईडी'कडून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.

राणा कपूर यांच्या समुद्र महल या वरळीतील घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी 'ईडी'च्या हाती काही कागदपत्रे लागली आहेत. बँकेने केलेल्या या कर्ज वाटपात कपूरचा नेमका सहभाग काय होता याचा तपास केला जात आहे. या कर्जपुरवठ्यानंतर कपूरच्या बायकोच्या खात्यात जमा झालेल्या मोठ्या रक्कमांची चौकशीही सुरू आहे. या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. येस बँकेचे संबंध डीएचएफएलशी असल्याचे उघड झाले. ईडीकडून इक्बाल मिर्ची प्रकरणात डीएचएफएलचे संस्थापक कपिल वाधवान यांची चौकशी सुरुच आहे. कपूर यांनी डीएचएफएललादेखील कर्ज दिले. ते कर्ज बुडित खात्यात गेले. या कर्जाऊ रकमेचा उपयोग करून डीएचएफएलने इक्बाल मिर्चीला मालमत्ता खरेदी करण्यासाठी मदत केल्याची माहिती राणा कपूर यांच्या चौकशीतून समोर आली आहे.

दरम्यान, येस बँकेला अडचणीत आणणारे बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणारा नीरव मोदी हे दोघेही मुंबईतील समुद्र महल या उच्चभ्रू इमारतीत राहातात. त्यामुळे या दोघांमध्ये काही संबंध तर नाहीत ना, अशी शंका उपस्थित झाली आहे.