Uddhav Thackeray Mumbai Rally: उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मला सूड हवाय, वेळ येईल तेव्हा एकटे लढण्याचा निर्णय घेईन असं त्यांनी जाहीर केलं आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण स्वबळावर लढावं असं मत मांडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नादी लागू नका असा इशारा दिला आहे. "जास्त आमच्या नादी लागू नका. जेवढे अंगावर याल तितके वळ घेऊन दिल्लीला जाल," अशा शब्दांत त्यांनी अमित शाह यांना सुनावलं आहे.
"सगळ्यांचं मत आहे की एकटे लढा. तुमची तयारी झाली आहे याची खात्री पटल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन. पण यावेळी मला सूड हवा आहे. जो महाराष्ट्राच्या पाठीत, कुशीवर वार करतो तो गद्दार आणि त्याचा वरदहस्त महाराष्ट्रात दिसता कामा नये. वेळ येईल तेव्हा एकटे लढण्याचा निर्णय घेईन," असं सांगत उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
"घराघरात त्यांनी प्रचार केला की मी हिंदुत्व सोडले. बाबरी पाडली याबद्दल वाजपेयी,अडवाणींनी माफी मागितली होती. नवाज शरीफांच्या बर्थडेचा केक मोदी तुम्ही खायला गेला होता. अमित शाहांना आवाहन आहे की भाजपाच्या झेंड्यातील हिरवा काढा मग. भाजप आरएसएस फक्त काड्या लावते. दंगली पेटवून पळायचे, बाबरी पाडली पण आम्ही नाही त्यातले बोलले," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. मी हारणारा नाहीय. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
"निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा आपण भेटत आहोत. हिंदूह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आपण षणमुखानंद हॉलमध्ये करणार होतो. पण दोन महिन्यांपूर्वी जो काही निकाल लागला तो मला पटला नाही. मधे अब्दाली म्हणजे अमित शाह इथे येऊन गेले. त्यांनी महाराष्ट्रातील हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे असं म्हटलं. अमित शाहजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
"अमित शाह यांचा समाचार घेतो. उद्या परत येणार आहेत. काल काय बोलले त्याचा आज आणि उद्या काय बोलतील त्याचा परवा समाचार घेणार. पण समाचार घेणार, मी नाही सोडत. मिठी मारु तर प्रेमाने मारु, पण पाठीत वार केल्यावर वाघनखं काढू. हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे," असा इशारा त्यांनी दिला.