माहुल प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला यश; पुनर्वसनाला सुरुवात

प्रदूषणाने खंगलेल्या आणि मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या माहूलच्या प्रकल्पबाधितांच्या लढ्याला अखेर यश

Updated: Mar 7, 2020, 11:16 PM IST
माहुल प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला यश; पुनर्वसनाला सुरुवात title=

प्रशांत अंकुशराव झी मीडिया, मुंबई : प्रदूषणाने खंगलेल्या आणि मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या माहूलच्या प्रकल्पबाधितांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. या रहिवाशांचं माहूलमधून पुनर्वसन सुरु झालं आहे. मुंबईतील विविध प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुंबईच्या माहुल येथे करण्यात आलं. मात्र माहुलची परिस्थिती पाहता या प्रकल्पग्रस्तांना नरक यातना भोगण्यासाठी पाठवलंय का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. कारण माहुलची अवस्थाच तशी आहे. इथल्या प्रदुषणाने अनेकांनी आपला जीव गमावला आहे. 

अखेर विविध प्रकल्पात बाधित झालेले माहुलवासीय एकत्र आले आणि त्यांनी प्रशासन आणि सरकार विरोधात लढा दिला. या नारकातून सुटका करा आणि माहुल येथून स्थलांतर करा ही एकच त्यांची मागणी होती. त्यासाठी विविध आंदोलनं झाली. न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरील ४९७ दिवसाच्या लढाईनंतर अखेर या रहिवाशांच्या लढ्याला यश आलं.

३०० प्रकल्पग्रस्तांना मुंबईच्या गोराई येथे घर बदलून देण्यात आलं. त्याचे पत्रा आणि चावी वितरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी या रहिवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या लढ्यात त्यांना साथ देणाऱ्या झी २४तासचेही या रहिवाशांनी आभार मानले.  

सध्या साडेपाच हजार घरांपैकी फक्त ३०० घरं मिळाली आहेत. इतर घरंही लवकरच मिळतील असं आश्वासन या रहिवाशांना देण्यात आलं आहे. शेवटच्या रहिवाशाचं स्थलांतर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या रहिवाशांनी केला आहे. 

आंदोलन कसं असावं आणि विजय कसा मिळवावा हे या माहुलवासीयांच्या आंदोलनाने साऱ्यांना दाखवून दिलं आहे. भविष्यातील त्यांच्या लढ्यात झी २४तासची साथ राहील हे वेगळं सांगायला नको.