ST Fare Hike: गेल्या तीन वर्षात एसटी भाडेवाढ करण्यात आलेली नाही. एसटी बस प्रवाशांची संख्या वाढलीय. अशातच नव्या सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या संभाव्य भाडेवाढीचे संकेत दिलंय. पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे एसटीच्या संभाव्य भाडेवाढीवरून मंत्रिमंडळातच विसंवाद पाहायला मिळत आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दरवाढीचे संकेत दिले आहेत. लवकरच एसटीच्या दरवाढीबाबत निर्णय घेऊ असं प्रताप सरनाईकांनी सांगितलंय. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाडेवाढीची शक्यता फेटाळली आहे. मंत्रिमंडळासमोर असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं अजित पवार म्हणाले.
एसटीच्या संभाव्य भाडेवाढीवरून महायुती सरकारमध्येच विसंवाद असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एसटीच्या संभाव्य भाडेवाढीबाबतचे संकेत दिलेत. लवकरच दरवाढीबाबत निर्णय घेऊ, असंही सरनाईकांनी म्हटलंय.
दिवसेंदिवस खर्च वाढत आहेत. दरवर्षी डिझेल आणि सीएनजीच्या किमती देखील वाढत आहेत. खर्च वाढत असल्याने एसटी महामंडळामध्ये भाढेवाढ करणे अपरिहार्य असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. मागच्या तीन ते चार वर्षांच्या कार्यकाळात एसटी महामंडळात भाडे वाढ झालेली नाही. त्यामुळे कदाचित या बैठकीमध्ये भाडेवाढीचा विषय निघू शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा समोर आल्यानंतर त्यावर चर्चा होणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितलं होतं.
परिवहन मंत्री एसटी भाडेवाढीची भाषा करताहेत. मात्र अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी याबाबतचा प्रस्तावच आला नसल्याचं म्हटलंय. चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय. पण एसटीच्या दरवाढीवरून मंत्रीमंडळातच विसंवाद आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
एसटी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या चांगल्या पुरवणाच्या संदर्भात प्रयत्न करावा लागणार असल्याचे ते अजित पवार यांनी म्हटले आहे. भाढेवाढ करायची म्हटले तर बसेस खराब असतील तर कशाची भाडेवाढ? असा प्रश्न लोक विचारतील. त्यामुळे चर्चा करून यातून योग्य तो मार्ग काढणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलंय.
दुसरीकडे एसटीच्या संभाव्य भाडेवाढीच्या वादात विरोधकांनीही उडी घेतलीय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला जोरदार टोला लगावलाय. आम्ही दरवाढ होऊ देणार नसल्याचा निर्धारच रोहित पवारांनी बोलून दाखवला.
एसटी महामंडळानं 2 ते 3 कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी स्वयंचलित भाडे सुधारणा सूत्राअंतर्गत भाडेवाढीची मागणी केली होती. गेल्यावर्षी हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडं पाठवण्यात आला होता. मात्र एसटीची लालपरी ही राज्यातील गोरगरिबांचं सर्वसमान्यांचं प्रवासाच महत्वाचं साधन आहे. त्यामुळे एसटीची दरवाढ करताना सरकारने पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे.