Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहिर शाहाला (Mihir Shah) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली असून आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पघातापूर्वी मिहीर शहाने 12 पेग रिचवले होते अशी माहिती सूत्रांनी दिलीय. अपघाताच्या 4 तास आधी मिहीरने त्याच्या 3 मित्रांसोबत 12 पेग रिचवले. त्यानंतर 4 तासातच अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीय. या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झालाय. तर त्यांचे पती जखमी झाले होते. 25 वर्षे पूर्ण नसतानाही आरोपीला विस्की देण्यात आल्याने जुहूतील बारवर कारवाई करण्यात आलीय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर काल मुंबई महानगरपालिकेने बारवर तोडक कारवाई केलीय.
अपघाताच्या 60 तासानंतर फरार असलेल्या मिहिर शाहाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्याला मदत करणाऱ्या 12 जणांनाही ताब्यात घेतलं असून मिहिरची गर्लफ्रेंडची चौकशी केली जाणार आहे. अपघातानंतर मिहिरने वडिल राजेश शहाला (Rajesh Shah) फोन केला होता. राजेश शाहानेच मिहिरला घटनास्थळावरुन पळून जाण्याचा सल्ला दिला होता.
केस आणि दाढी कापली
अपघातानंतर मिहिरने कारवर लावलेला पक्षाचा झेंडा आणि कारची नंबर प्लेट काढून फेकून दिली. त्यानंतर इतर सबूतही त्याने नष्ट करण्याचे प्रयत्न केला. आपली ओळख लपवण्यासाठी मिहिरने त्याच दिवशी सलूमध्ये जात केस आणि दाढी कापली.
ड्रायव्हर-मिहिरची आमने सामने चौकशी होणार
कारची नंबर प्लेट शोधण्याचे पोलिस प्रयत्न करतातय. अपघातानंतर मिहिर कोणाकोणाला भेटला, कोणाच्या घरी गेला आणि त्याला फरार होण्यासाठी कोणी कोणी मदत केली याचाही पोलीस शोध घेत आहेत. आरोपी मिहिरच्या बीएमडब्ल्यू कारचा चालक राज ऋषी बिदावत आणि मिहिरची आमने सामने बसवून चौकशी केली जाणार आहे. कोणाच्या सांगण्यावरुन चालक राज ऋषी बिदावतने अपघाताचा गुन्हा आपल्या अंगावर घेतला याचाही शोध मुंबई पोलीस घेतायत.
संजय राऊत यांचा आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केल्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढलेयत. मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे का? 10 लाख देऊन कावेरी नाखवांचा जीव परत येणार आहे का...? आतापर्यंत एवढी भीषण दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्यांकडून साधं निवेदन, साधी संवेदनाही नाही, असा हल्लाबोल राऊतांनी केलीय.