'वाघनखं अफजल खान वधावेळीची', जीआरमधील उल्लेखांनंतर आता मुनगंटीवार म्हणतात, 'कोणीच दावा केला...'

वाघनखांबाबत जीआर आणि मंत्र्यांच्या माहितीत तफावत आढळून आली आहे. जीआरमध्ये वाघनखं अफजल खान वधावेळीची असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.   

शिवराज यादव | Updated: Jul 11, 2024, 02:33 PM IST
'वाघनखं अफजल खान वधावेळीची', जीआरमधील उल्लेखांनंतर आता मुनगंटीवार म्हणतात, 'कोणीच दावा केला...' title=

वाघनखांबाबत जीआर आणि मंत्र्यांच्या माहितीत तफावत आढळून आली आहे. जीआरमध्ये वाघनखं अफजल खान वधावेळीची असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, झी 24 तासने बातमी दाखवल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत निवेदन दिलं आहे. त्यावेळी लंडनहून आणली जाणारी वाघनखं शिवरायांनी वापरल्याचा कुणी दावा केलेला नाही अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे. 

जीआरमध्ये नेमका काय उल्लेख?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही देशातील जनतेला प्रेरणादायी आहेत व याप्रसंगाची मोहिनी जनमानसात आहे. त्यामध्ये विजापूरचा सरदार अफजलखान याने सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीमध्ये खानाने केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी वाघनखे वापरुन खानाचा केलेला वध, या चित्तथरारक घटनेचा समावेश आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं लंडनमधील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम येथे जतन करण्यात आली आहे. 

सदर वाघनखं जनसामन्यांच्या दर्शनाकरिता राज्यास तीन वर्षाकरिता उसनवार तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझिअमने संमती कळवली आहे. ही वाघनखं सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबईत प्रदर्शित कऱण्याचा मानस आहे. 

सुधीर मुनगंटीवारांच्या निवेदनात तफावत

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत निवेदन देताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरल्याचा दावा कुणीही केलेला नाही असं म्हटलं आहे. "अफजल खान कबरीचे अतिक्रमण आम्ही हटवले. शिवभक्तांनी आमच्याकडे वाघनखं आणण्याबाबत मागणी केली. आम्ही ब्रिटन सरकार, म्युझियमशी पत्रव्यवहार केला. आम्हाला पुरावे दिले गेलेत. व्हिक्टोरीया म्युझियमला ही वाघनखं देण्यापूर्वी त्याचे प्रदर्शन केले होते. त्याच्या बातम्याही दिल्या आहेत. म्युझियमने ती वाघनखं महाराजांची आहेत असा दावा केलेला नाही. एक वर्षासाठी वाघनखं देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, पण आपल्या प्रयत्नांमुळे तीन वर्ष राहतील असं ठरलं," अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 

"19 तारखेला ही वाघनखं साता-यातील सरकारी म्युझिअममध्ये ठेवली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे वंशज यांच्या उपस्थितीत ही वाघनखं दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यासह शस्त्रास्त्र दालनाचं उद्घाटनही 19 तारखेला होणार आहे. याचं मी सर्वांना निमंत्रण देत आहे,"असंही त्यांनी सांगितलं. तसंच इतके इतिहासकार, संशोधक असताना फक्त एका एका इतिहासकारानेच यावर आक्षेप घेतला असंही म्हटलं. 

पुढे ते म्हणाले की, "य़ा संवेदनशील विषयात विरोधी पक्षातील 99 टक्के नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत. त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी विरोधी पक्षाचं, शिवभक्तांचं अभिनंदन करतो". 

"वाघनखं आणण्यासाठी भाडं दिलं जाणार आहे असा दावा केला जात आहे. पण एकही नवीन पैशांचं भाडं दिलेलं नाही आणि दिलं जाणार नाही. वाघनखं आणण्यासाठी करोडो रूपये खर्च झालेला नाही. आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा आहे त्यापेक्षाही कमी खर्च झाला आहे. जाणे, येणे, करार करणे यासाठी फक्त 14 लाख 8 हजार खर्च झालाय. हा गैरसमजही दूर करण्याची गरज आहे," असा दावा सुधीर मुनगंटीवरार यांनी केला आहे. 
 
"वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटी खर्च केला जात असल्याचं बोललं जात आहे. यासाठी कोणताही खर्च केलेला नाही. हा खर्च इतर शस्त्रं, प्रदर्शन, नूतनीकरण डागडुजीसाठी केलेला खर्च आहे," अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरल्याचा कुणीही दावा केला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याभिषेकासंदर्भात एक पुस्तिका सर्वांना दिली जाईल. हा संवेदनशील विषय आहे. मनात शंका उपस्थित झाल्यास ती भेटून त्याचं निरसन करा असं आवाहनही त्यांनी केलं.