मुंबई : आता जर तुम्ही मास्क घातलं नसेल तर तुम्हाला भाजी विकत घेता येणार नाहीये. ओमायक्रॉन व्हेरिएंटचे वाढते रूग्ण पाहता धोका ओळखून मुंबईतील भाजी मंडईने हा निर्णय घेतला आहे. मास्क प्रमाणे सोशल डिस्टंसिंगवरही लक्ष दिलं जाणार आहे. यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.
कोविडचा वाढता संसर्ग पाहता दक्षिण मध्य मुंबईतील प्रसिद्ध 160 वर्षे जुन्या भायखळा भाजी मंडईने हा मोठा निर्णय घेतला आहे. दररोज 7 ते 10 हजार ग्राहकांना भाजीपाला विकणाऱ्या या भायखळा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये मास्कशिवाय येणाऱ्या कोणालाही भाजीपाला दिला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
ओमायक्रॉनची दहशत लक्षात घेता राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत आणि सर्व निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात, मुंबई महानगर पालिकेने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीवरही बंदी घातली आहे.
तर दुसरीकडे मध्य प्रदेश नंतर आता हरियाणा, गुजरात, यूपी आणि इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी देखील रात्री कर्फ्यू जाहीर केला आहे. याशिवाय राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सरोजिनी नगर मार्केटमधील वाढती गर्दी पाहता ऑड-ईवन नियमाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरातूनच करावे लागणार आहे. मुंबई महापालिकेने 31 डिसेंबरचे कार्यक्रम बंदीस्त आणि खुल्या जागेत साजरे करण्यास आणि नववर्षाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यासही निर्बंध घातले आहेत.
गेट वे ऑफ इंडिया, जूह बीच, मोठ-मोठी हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या 108 वर गेल्याने आणि वाढत्या संकटामुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.