नारायण राणेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे सेना स्टाईलने प्रत्युत्तर, म्हणाले....

 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. 

Updated: Aug 22, 2021, 02:21 PM IST
नारायण राणेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे सेना स्टाईलने प्रत्युत्तर, म्हणाले.... title=

ठाणे : वसई विरारमधील जनआशीर्वाद यात्रेत बोलताना भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी , 'नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे नव्हे. तर ते मातोश्रीवरून चालविले जात आहे. तसेच शिंदे हे फक्त सही पुरते नगरविकासमंत्री असून ते मार्ग शोधत आहेत.' असे म्हटले होते. त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. 

नारायण राणे यांच्या विधानावर बोलताना काय म्हणाले एकनाथ शिंदे

 केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाबाबत मी देखील काल माहिती घेतली. त्यांनी हा शोध कुठून लावला काय माहित! परंतु बोलयला कोणीही काही बोलू शकतो. मी माझ्या विभागामध्ये सक्षमपणे काम करतोय. या कामावर मी समाधानी आहे. मला नगरविकास खात्याचे सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे मी राज्यातील महत्वकांशी प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देत आहेत. 

माझ्या विभागामध्ये मातोश्री आणि मुख्यमंत्र्यांचे हस्तक्षेप असल्याचे विधान चुकीचे आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. खरे तर राणे साहेब मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे राज्याच्या हिताचे मोठे निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय सर्वच विभागातील मंत्री मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच घेत असतात.आणि त्यात कुठलेही गैर नाही. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखालीच निर्णय घेत असतील.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक अशाप्रकारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी विधानं करीत आहेत. त्यामुळे राणेंच्या विधानावर जास्त बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.