Mumbai Rains: राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता तर नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. मुंबईला जोरदार पावसाने झोडपले आहे. मुंबई लोकलवर याचा परिणाम झाला आहे. लोकलच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. रेल्वे स्थानकाबाहेरदेखील पाणी साचलंय. त्यामुळे कामावरुन परतणाऱ्या मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला. सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीये. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊणतास उशीराने सुरूये.पश्चिम रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशीराने धावतेय.तर हार्बर रेल्वे जवळपास अर्धातास उशीराने धावतेय.ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये भरलं पाणी अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबईतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज कोसळलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरलादेखील मुंबई सारखाच पाऊस पडतोय. ठाण्याला पाऊस कमी आहे. त्या ठिकाणचा पाऊस पाहून तसा निर्णय घेण्यात येईल. सध्या मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. मुंबईतील महाविद्यालयांनादेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट आहे. मुंबईभर पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या मुंबई, ठाणे, रायगड साठी ऑरेंज अलर्ट जरी. तर पालघरसाठी उद्या देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.