अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का? भाजपचे मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 25, 2024, 09:44 PM IST
 अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का? भाजपचे मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार? title=

कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : विधानसभा निवडणूक जवळ आल्याने अनेक राजकीय नेते मंडळी इतर पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. आपापल्या मतदारसंघात असलेले सोयीचे राजकारण आणि तिकीट मिळण्याची शक्यता, यावरही पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीची (Rastravadi Sharadchandra Pawar) तुतारी फुंकण्याची शक्यता आहे..

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) हे पूत्र वैभव पिचड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच त्यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतलीये. त्यामुळे पिचड कुटूंबीय पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. पिचड पितापुत्र आणि शरद पवार यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. अहमदनगर जिल्ह्यात हा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

मधुकर पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मधुकर पिचड हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवारांची भेट घेणं यामध्ये कुठलेही गैर नाही, ते कुठेही जाणार नसल्याचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटलंय..

मधूकर पिचड यांची शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे. पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते. 2014 पर्यंत मधुकर पिचड हे अकोले विधानसभेचे आमदार होते. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर वैभव पिचड विजयी झाले. पण 2019 मध्ये पिचड पितापुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या किरण लमहाटे यांच्याकडून वैभव पिचड यांचा पराभव झाला. अकोले तालुक्यातील नगरपालिका आणि अगस्ती दूध संघावर पिचड यांचं वर्चस्व आहे.

गेल्या काही दिवसांपासून मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांची राजकीय अडचण झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे आता वैभव पिचड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पिचड पितापुत्रांनी तुतारी हाती घेतल्यास शरद पवार पिचडांना बळ देणार की अमित भांगरेंना हे पाहणं महत्त्वाचं आहे...