योगेश खरे, झी २४ तास, नाशिक: नाशिकच्या दिंडोरीचं राजकारण नरहरी झिरवळांभोवती फिरणार आहे...झिरवाळ शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेल्यानं त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालंय.. त्यामुळे झिरवळांनी आपल्या पुत्राला रिंगणात उतरवण्याची तयारी केलीये.. मात्र, त्यांची राजकीय खेळी फसल्याचं चित्र आहे..
शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेलेले नरहरी झिरवाळ हे दिंडोरी विधानसभेसाठी राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत.. गेल्या दोन महिन्यांपासून झिरवाळ कुटुंबियांकडून सुरु असलेली राजकीय खेळी आता फसल्याची चर्चा सुरु आहे.. दिंडोरीतील शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताचे बॅनर गोकुळ झिरवाळ यांनी ठिकठिकाणी लावत निवडणूक लढवण्याचा दावा केलाय. मात्र, याच सभेत दिंडोरीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या सुनिता चारोसकर यांना शरद पवार पक्षात प्रवेश देण्यात आला. चारोसकर या माजी आमदार रामदास चारोसकर यांच्या पत्नी आहेत.
नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांसोबत जात शरद पवारांचा कसा घात केला, याची उजळणी भर भाषणात इच्छुक उमेदवारांनी केली, त्यामुळे सभेत बसायला खुर्ची न मिळालेल्या गोकुळ झिरवाळांनी सभेतून पळ काढला..
शिवस्वराज्य यात्रेत युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही नरहरी झिरवाळ यांचा चांगलाच समाचार घेतलाय. तर गोकूळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून दिंडोरी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे.मात्र, नरहरी झिरवाळ आणि पूत्र गोकूळ झिरवाळ हे माध्यमामध्ये उलटसुलट वक्तव्य करत आहेत. शरद पवारांसोबत असल्याचं गोकुळ झिरवाळ यांचं मत आहे तर मुलगा कुठेही जाणार नाही, असं नरहरी झिरवाळांनी म्हटलंय.
झिरवाळ यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांपूढे उपस्थित होत असल्यानं झिरवाळांची राजकीय खेळी फसल्याचं बोललं जातंय.