दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १०० दिवस पूर्ण केले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुक्काम मातोश्रीवरच आहे. उद्धव ठाकरे काही दिवसांनी मातोश्रीवरून वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी मुक्काम हलवतील अशी शक्यता होती. आता मात्र आपण मातोश्रीवरच राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
मलबार हिल येथील हा वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान. या बंगल्यावर राहण्याचं अनेक राजकारण्यांचं स्वप्न असतं. उद्धव ठाकरे यांना तर ही संधी चालून आली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्री बंगला सोडवेना. सुरुवातीचे काही दिवस उद्धव ठाकरे मातोश्रीवर राहून नंतर वर्षावर जातील अशी चर्चा होती. मात्र आता उद्धव ठाकरे वर्षावर जाणार नसल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे.
संपूर्ण राज्याचा गाडा हाकणार्या मुख्यमंत्र्यांचं काम सकाळी लवकर सुरू होतं. त्यामुळेच वर्षावर निवासस्थान आणि मुख्यमंत्री कार्यालय अशी दुहेरी व्यवस्था आहे. पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी राज्याच्या स्थितीची माहिती सकाळीच मुख्यमंत्र्यांना देत असतात, शहरात राहणार्या या अधिकार्यांना यासाठी सकाळी मातोश्रीवर जावं लागतं, त्यात त्यांचा वेळ जातो.
- वांद्रे इथे असलेला मातोश्री बंगला ते मंत्रालय हे अंतर २० किलोमीटर आहे.
- मुख्यमंत्र्यांचाही मातोश्री ते मंत्रालय या प्रवासात वेळ जातो.
- सकाळी मंत्रालयात येताना आणि संध्याकाळी किंवा रात्री मोतोश्रीवर परतताना या मार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी असते, या वाहतूक कोंडीतून रोज मुख्यमंत्र्याच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देताना वाहतूक पोलिसांची रोज तारांबळ उडते.
- चारी बाजूने उंच भिंतीची तटबंदी असल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वर्षा बंगल्यावर सुरक्षा ठेवणं पोलीस यंत्रणेसाठी सोपं जातं.
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मातोश्रीबाहेर पिस्तुलधारी तरुणाला अटक करण्यात आली होती, तर एका शेतकर्यांनेही मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे पोलीस यंत्रणेला मातोश्रीवर अधिक सतर्क रहावं लागतं.
मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षावर राहायला न गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी मागील १०० दिवसांत काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या बैठका या बंगल्यावर घेतल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व बाबी बाजूला सारत मोतोश्रीवरच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांचा मोतोश्रीवरच मुक्कामी राहण्याचा निर्णय त्यांनी भावनिक दृष्ट्या घेतला असला तरी त्यांचा हा निर्णय प्रशासन आणि पोलीस यंत्रणेस तापदायक ठरतो आहे.
मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम काही दिवस वर्षा बंगल्यावर होता. त्यांनी बंगला सोडल्यानंतर बंगल्यातील भिंतीवर काही आक्षेपार्ह मजकूर लिहल्याचं आढळून आलं होतं. तेव्हा वर्षा बंगल्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे यांनी यामुळेच वर्षा बंगल्यावर न जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री होऊनही मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी न जाणारे उद्धव ठाकरे बहुधा पहिले मुख्यमंत्री असावेत.