अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही- संजय राऊत

अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. 

Updated: Jul 20, 2020, 12:03 PM IST
अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही- संजय राऊत title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: अयोध्येशी शिवसेनेचे पूर्वापार नाते आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, अयोध्येशी शिवसेनेचं पूर्वापार नातं आहे. हे नातं केवळ राजकारणासाठी नाही. मुख्यमंत्री नसताना आणि असतानाही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आहेत. त्यामुळे आता त्यांना अयोध्येला जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, असे राऊत यांनी म्हटले. 

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. या रस्त्यातील अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत. राम मंदिरासाठी श्रद्धा आणि हिंदुत्त्वाच्या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान केले आहे, असेही राऊत यांनी म्हटले. येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमीपूजनचा सोहळा संपन्न होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असला तरी मंदिर निर्माणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी: राम मंदिराच्या भूमिपूजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

शिवसेनेचं नाव यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. मात्र, भाजपशी फारकत घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे निमंत्रण मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळत आहे.