"हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा", उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे उपस्थितांना संबोधित केलं. 

Updated: Jul 4, 2022, 05:15 PM IST
"हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा", उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान title=

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.  त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहेत. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संघटनेत चांगलेच सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे उपस्थितांना संबोधित केलं. 

"लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपाकडून शिवसेना संपवण्याचा डाव सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर आपलं चुकलं असेल तर जनता आपल्याला घरी बसवेल. जर ते चुकले असतील तर त्यांना घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपाने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात.", असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केलं आहे. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

 यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. "महाराष्ट्रातील नवं शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा.", असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं.