मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात जोरदार फटकेबाजी; भाषणातील सर्व मुद्दे एका क्लिकवर

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर अनेक नेत्यांनी आज विधीमंडळात भाषण केले. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेनंतर सविस्तर भाषण केले.  त्यांनी या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले.

Updated: Jul 4, 2022, 04:53 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात जोरदार फटकेबाजी; भाषणातील सर्व मुद्दे एका क्लिकवर title=

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर अनेक नेत्यांनी आज विधीमंडळात भाषण केले. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेनंतर सविस्तर भाषण केले.  त्यांनी या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 

  • आज बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचं सरकार स्थापन झालं आहे. गेले 15-20 दिवस सातत्याने माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांचं मी आभार मानतो. 
  • मला अजुनही विश्वास बसत नाहीये. की मी या सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. विरोधी पक्षाकडून सत्तेकडे अनेकदा लोकं जातात. परंतू जी ऐतिहासिक घटना महाराष्ट्रात घडली त्याचं राष्ट्रीय स्तरावर देखल घेतली गेली. 
  • माझ्यासोबत अनेकजण सत्तेत मंत्री होते. परंतू ही मंडळी स्वतःचं मंत्रीपद दावावर लावून माझ्यासोबत आली. एकीकडे बलाढ्य सरकार, बलाढ्या नेते सत्ता यंत्रणा आणि दुसरीकडे एक सर्व सामान्य बाळासाहेबांचा शिवसैनिक होता.
  • मी विधानभवनातून विधानपरिषद निवडणूकीच्या वेळी बाहेर पडलो. तेव्हा माझा झालेला अपमान या विधानसभेतील अनेकांनी पाहिला. तेव्हाच मी बाळासाहेबांच्या विचारांनुसार अन्यायाविरूद्ध पेटून उठलो. आणि माझ्यासोबत येणाऱ्यांना सोबत घेतले आणि निघालो.
  • सुनिल प्रभुंना देखील माहितीये माझं कशापद्धतीने खच्चीकरण करण्यात आलं. शिवसेना वाचवण्यासाठी शहिद झालो तरी चालेल परंतू आता माघार नाही हे मी ठरवलं होतं.
  • एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही एकडे तिकडे जाताना मोठी तारांबळ होतं. माझ्यावर नको नको ते आरोप करण्यात आले. अपमान केला, दुषणं दिलं, बदनामी केली. इकडे मला चर्चेसाठी मानसं पाठवली आणि तिकडे मला गटनेते पदावरून काढून टाकली. पुतळे जाळले. आणि घरावर दगडफेक करण्याचे आदेश दिले. परंतू एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगडफेक करण्याची हिंम्मत करणारे अद्याप पैदा झालेले नाही.
  • 30 ते 35 वर्षे मी शिवसेनेसाठी जिवाचं रान केलं. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावीत झालो. धर्मवीर आनंद दीघे साहेबांच्या सानिध्यात आलो. तेव्हा मी शाखाप्रमुख झालो.
  • मी पहिल्यांदा 1997 नगरसेवक झालो त्याच्या आधीच मी होऊ शकलो असतो. परंतू त्यावेळी तेथे युतीकडून भाजपचे नगरसेवक होते. परंतू आम्ही युती पाळली. आणि 5 वर्षानंतर नगरसेवक झालो.
  • पक्षासाठी मी घराकडेही लक्ष दिले नाही. मागे वळून पाहिले नाही. आता आमचे बाप काढण्यात आले, कोणी रेडा म्हणाले, कोणी प्रेत म्हणाले, आमच्यासोबतच्या महिला आमदारांना वेश्या म्हणाले. परंतू आमच्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडले नाही.
  • अन्याय झाला की मला शांत राहता येत नाही. माझं रक्त अशावेळी सळसळ करते. परंतू यावेळी दीपक केसरकर यांनी माझं काम हलकं केलं. आमची भूमिका दीपक केसकर यांनी लोकांपर्यंत आणि मीडियापर्यंत योग्य पद्धतीने पोहचवली. 
  • श्रीकांत देखील अभ्यास करून डॉक्टर झाला. परंतू मी बाप म्हणून त्याला कधीही वेळ देऊ शकलो नाही. पूर्ण वेळ संघटनेसाठी काम केलं. माझ्यावर दुःख कोसळलं असताना दीघे साहेबांनी मला आधार दिला. नाहीतर मी जगणं विसरलो होतो. 
  • परंतू बाळासाहेब आणि दीघे साहेबांनी मी देव मानत होतो. त्यामुळे पुन्हा संघटनेचं दिवसरात्र काम केलं. ठाण्याच्या तरुणाईला उद्ध्वस्त करणारे 16 डान्सबार मी फोडले आणि बंद पाडले. त्यावेळी मोठ्या केसेस मी अंगावर घेतल्या.
  • आम्ही आंदोलनं केली. शिवसेना वाढवत गेलो. जिवाला जीव देणारे कार्यकर्ते जोडत गेलो. दीघे साहेबांच्या मृत्यूनंतर आपला बाप गेला असं वाटलं. त्यानंतर लोकांना वाटलं की, ठाण्यातील शिवसेना संपेल. परंतू त्यानंतरही आम्ही शिवसेना ठाण्यात उभी केली. 
  • ठाण्यात नगरसेवक, ग्रामपंचायत, आमदार खासदार शिवसेनेचे होत गेले. ही आमच्या दिवसरात्र संघटनेसाठी काम केल्याची पावती होती. 
  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी रस्ते विकासाचा राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वकांशी असा समृद्धी महामार्गाचे काम करण्याची जबाबदारी मला मिळाली. देवेंद्रजींनी सांगितले हा आपल्या ड्रिम प्रोजेक्ट आहे. या महामार्गामुळे लाखो लोकांना त्याचा फायदा झाला. 
  • 2019ला युतीला बहुमत मिळाले तेव्हा, मला मुख्यमंत्री करणार होते. परंतू मला आमच्याच पक्षातून सांगण्यात आलं की, तुम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीतून विरोध आहे. परंतू नंतर कळलं की, राष्ट्रवादीकडून असा काही विरोध नव्हताच.
  • परंतू महाविकास आघाडीनंतर निवडून आलेल्या आमदारांमध्ये प्रश्न निर्माण होत होता. आपली नैसर्गिक युती भाजपसोबत आहे. आपल्याला स्थानिक निवडणूक लढवणं कठीण जाईल. मी 5 वेळा उद्धव साहेबांना हे सांगण्याचा प्रयत्न केला.
  • अडीच वर्षात आम्हाला आमच्या विचारांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली. उदा. सावरकरांवर चुकीचं लिहणाऱ्याविरोधात सभागृहात बोलता येत नव्हतं. ज्या दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट केलं. त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकलो नाही. 
  • आम्ही कालही शिवसैनिक आहोत. आजही शिवसैनिक आणि उद्याही शिवसैनिक आहोत. शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार कोणी काढला? 
  • हिंदूत्वाला नेहमी विरोध करणाऱ्या पक्षासोबत कसं बसायचं? हा प्रश्न शिवसेनेच्या आमदारांना होता. बाळासाहेबांनी 1993 मध्ये मुंबई दंगलीपासून वाचवली. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा अजेंडा घेतलाय. 
  • आम्ही बंडखोर आणि गद्दार नाही. आम्ही उठाव केला. जळगावमध्ये आमच्या एका नेत्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र सडवला अशी टीका त्या नेत्याने केली होती. मग आम्ही तुमच्यासोबत कसे राहणार?
  • आम्हाला म्हणतात की, शिवसेना सोडून गेलेल संपले. परंतू त्यांना मी सांगू इच्छितो की, मी हिंदुत्वाच्या विरोधात गेलो नाही. हिंदुत्वासाठीच भूमिका घेतली. मी आणि देवेंद्रजी मिळून आता आम्ही राज्यात 200 जागा मिळवून दाखवू.
  • ज्यांनी अटलजींचं सरकार पाडलं त्यांच्यासोबत सरकार स्थापन करायचं नाही. मी आहे म्हणून शिवसेना आहे असं बाळासाहेब म्हणायचे. मी शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही. 
  • भाजपच्या वरिष्ठांनी शिवसेना भाजप युती सरकार यावं यासाठी प्रयत्न केले. आम्ही आता काम केलं तर पुन्हा आमचे 200+ आमदार निवडून येतील. नाहीत अजित दादांनी 100+ चे टार्गेट ठेवलेच होते. असा मिश्किल टोला एकनाथ शिंदे यांनी अजित दादांना लगावला.
  • शिवसेना सत्तेत असूनही शिवसैनिकांवर मोक्का लावण्यात आला. परंतू महाविकास आघाडीमध्ये शिवसैनिकांना निधी देखील मिळत नव्हता. मी स्वतः माझ्या विभागातील काही निधी स्थानिक शिवसैनिकांना देऊन त्यांचं मन हलकं करीत होतं. महाविकास आघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना, जिल्हाप्रमुखांपासून ते शाखाप्रमुखापर्यंतच्या शिवसैनिकांना ताकद देणं गरजेचं होतं. ते झालं नाही.
  • सर्वसामान्य शिवसैनिक माझ्याकडे पत्र घेऊन आले की, मी सरळ अधिकाऱ्यांना फोन लावतो. आणि कामं पूर्ण करायला सांगतो. पत्र वेगैरे नाही. परंतू थेट कामावर कारवाई करायला सांगतो. तरच लोकं आम्हाला निवडून देतील. आमचे 200 आमदार नक्की निवडून येतील. 
  • हे सरकार जे स्थापन झालंय याला बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एकनाथजी अच्छा काम करो, राज्य को प्रगतीपथपर ले जाओ. हम आपको किसी चिज की कमी नही होणे देंगे. 
  • आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. हे सरकार सर्वसामान्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आहे. प्रत्येकाला वाटावं हे आपलं सरकार आहे. मोदींजींनाही सुरूवातीला हिनवणाऱ्यांची पार्टी संपत चालली आहे. 
  • नरेंद्र मोदी यांनी विश्वात आपल्या देशाची किर्ती पसरवली. बाळासाहेब म्हणाले की, मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान करा. मी कलम 370 काढून टाकतो. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचा अजेंडा पूर्ण करणाऱ्या पक्षासोबत आपली नैसर्गिक मैत्री आहे. 
  •  
  • मी तुम्हाला आश्वस्त करतो की, चुकीची कामं करणार नाही. कोणावरही आकस बुद्धी ठेवणार नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्तेच राहणार. या राज्यांचं सर्वांगिन काम करणारं सरकार आपण चालवू. केंद्र सरकारचीही मदत घेऊ. आणि राज्याला सुजलाम सुफलाम करू.  आम्हाला कधीही ग ची बाधा होऊ देणार नाही. 
  • आपल्या सरकारच्या वतीने पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करू आणि बळीराजाच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न करू. अशी घोषणा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.