मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही भेट म्हणजे दोन वैफल्यग्रस्तांची असल्याचे भाजपने म्हटलेय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी मुंबईतल्या निवास्थानी भेट घेतल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिलाय. उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीत राज्यातल्या राजकीय स्थितीबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेनेनं त्यांची भूमिका घ्यावी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं समजतंय.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोल्यामुळे उद्धव ठाकरेंची सत्तेत राहण्याची मानसिकता नसल्याचं बोललं जातंय. दरम्यान, दोन वैफल्यग्रस्तांची ही भेट असल्याचा टोला भाजपनं लगावलाय. या भेटीबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.