'सगळी मंत्रिपदं घ्या, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच'

विधानसभा निवडणुकीच्या १२ दिवसानंतरही राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे.

Updated: Nov 4, 2019, 03:58 PM IST
'सगळी मंत्रिपदं घ्या, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच' title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या १२ दिवसानंतरही राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे रोज सामनामधून आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला करत आहेत. त्यातच आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. सत्तेत भाजपानं सगळी मंत्रिपदं घ्या पण मुख्यमंत्रीपद शिवसेनेचंच असल्याची रोखठोक भूमिका संजय राऊतांनी झी २४ तासशी बोलताना मांडली आहे.

भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, ८ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी भाजपने सगळी मंत्रीपदं घ्यावी, पण मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं, असं वक्तव्य केलं.

मुद्दा हा खात्यांचा नसून मुख्यमंत्रिपदाचा आहे. शिवसेनेला मलईदार खाती पाहिजेत, असं बोललं जातं, पण आम्ही बाळासाहेबांनी उभी केलेली मध्यमवर्गीय माणसं आहोत. आम्ही आमदार, खासदार, मंत्री होऊ, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते रस्त्यावरच काम करणार, असं राऊत म्हणाले.

गेल्या पाच वर्षांत सुडाचं राजकारण पेटल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. रोखठोक मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. माणूस जेव्हा मोठा असतो, लोकनेता असतो तेव्हा तो अशाप्रकारे यंत्रणा वापरून काम करत नाही. कमकुवत आणि कुवत नसलेलं नेतृत्व असतं त्यांना या उलाढाली आणि उचापती कराव्या लागतात, असा माझ अनुभव असल्याची टीका राऊत यांनी केली.