मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १२ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी राज्यातला सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेने वेट अँड वॉच भूमिका घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून पुन्हा ओला दुष्काळ पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत. नांदेड, लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील ७ ते ८ तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.
ओला दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट बांधावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातले सर्व शिवसेना आमदार दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
दुसरीकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, ही मागणी केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीत राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली.
शिवसेनेशी पुढील बोलणी राज्यस्तरावरील नेत्यांनीच करावी असे आदेश अमित शाहांनी दिल्याचं वृत्त आहे. भाजपाचं केंद्रीय नेतृत्व सत्तास्थापनेत हस्तक्षेप करणार नाही, मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेशी डील करावं असे आदेश अमित शाहांनी दिल्याचं समजतंय.
मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंशी बोलणं झालेलं नव्हतं असं भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतल्या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच शिवसेनेला मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद देण्यास अमित शाहांनी नकार दिल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. अमित शाह यांच्या या भूमिकेमुळे पाच आणि सहा नोव्हेंबरला होणारा शपथविधी बारगळण्याची शक्यता आहे.
अमित शाहांची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सरकार लवकरच स्थापन करणार असल्याची माहिती दिली. मात्र यावेळी त्यांनी सत्तासमीकरणावर भाष्य करण्याचं टाळलं. सत्तासमीकरणावर बोलणार नाही. तसंच भाजपातलंही कुणी बोलणार नाही. मात्र नवीन सरकार लवकरच स्थापन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेना अथवा महायुतीचा उल्लेख टाळला.