'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकारी नियुक्तीवरुन काही नेत्यांची नाराजी

मुंबईत 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीये. रामदास कदम, गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Updated: Sep 4, 2017, 10:46 PM IST
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकारी नियुक्तीवरुन काही नेत्यांची नाराजी title=

मुंबई : मुंबईत 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीये. रामदास कदम, गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

पक्षात पदाधिकारी नेमताना आम्हा नेत्यांना काहीहि माहिती नसते. पण आमदार निवडून आणण्याची जबाबदारी मात्र आमच्यावर टाकली जाते. निवडणुकीत यश मिळालं नाही तर नेत्यांना जाब विचारला जातो, असा सूर या नेत्यांचा होता. 

शिवसेनाभवनात पक्षाचे आमदार, खासदार येतात आणि काही ठराविक नेत्यांबाबतीतच विचारणा करतात. मग आम्ही नेत्यांनी सेनाभवनमध्ये येऊन का बसावं ? असा सवालही काही नेत्यांनी उपस्थित केला. नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतलीये. 

यापुढे नेमणुका नेते आणि जिल्हा संपर्कप्रमुखांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाहीत, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिलीये. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विभागवार मेळावे आणि नेते, जिल्हासंपर्क प्रमुखांची दर महिन्याला बैठक घेण्याचे आदेश उद्धव यांनी या बैठकीत दिले.