मुंबई : शिवसेनेकडून चर्चेचे सगळे दरवाजे बंद झाल्याची सूत्रांची माहिती आहे. बडे उद्योगपती तसेच संभाजी भिडे गुरुजी यांच्या माध्यमातून शिवसेनेशी चर्चा करण्याचे प्रयत्न फोल ठरला आहे. शिवसेना आज वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं चर्चेचे सर्व दरवाजे बंद केल्याची स्थिती आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये समेट घडवून आणण्यासाठी कोणालाही मध्यस्थी घेण्यास शिवसेनेने नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप शिवसेनेतली कोंडी फोडण्यासाठी भाजपच्या जवळच्या नेत्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही. गुरुवारी अचानक भेड थेट मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र, भिडेंना भेट देण्याचे कोणतेही कारण नाही. आदराने त्यांना चहापाणी देऊन पाहूणचार करा. पण, भेटता येणार नाही, हे कळवा, असा आदेश 'मातोश्री'वरुन आला. त्यामुळे भिडे यांना उद्धव यांचे भेट मिळाली नाही.
दरम्यान, तेराव्या विधानसभेचा कार्यकाल आता संपत आल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देणार आहेत. तेरावी विधानसभा ही १० नोव्हेंबर २०१४ ला आमदारांच्या शपथविधीमुळे अस्तित्वात आली होती. आता येत्या ९ नोव्हेंबरला ५ वर्षे पूर्ण होत असल्याने या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे. या काळांत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे एक तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. अर्थात राज्यपाल यानिमित्ताने काही फडणवीस यांना काही वेगळे आदेश देतात का हे बघावं लागेल.