आणखी एका चक्रीवादळाचा धोका; मुंबईत पावसाच्या जोरदार सरी

रेल्वे वाहतुकीवर परिणाम... 

Updated: Nov 8, 2019, 07:23 AM IST
आणखी एका चक्रीवादळाचा धोका; मुंबईत पावसाच्या जोरदार सरी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गुरुवारी रात्री उशिरा मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आणि कालांतराने काही ठिकाणांवर पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. या जोरदार सरींमुळे मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये नागरिकांची त्रेधातिरपीट पाहायला मिळाली. 

अवेळी पावसाच्या या जोरदार सरी शुक्रवारी सकाळीसुद्धा सुरुच राहिल्यामुळे कामासाठी निघालेल्यांना याचा फटका बसला. दरम्यान हवामानातील या बदलामुळे आणि महा चक्रीवादळाच्या परिणामांचं रुपांतर हे पावसाच्या सरींमध्ये झालं आहे. ज्याचे थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाले आहेत. पश्मिच रेल्वे वेळापत्रकानुसार धावत असली, तरीही मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मात्र पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक ही काही मिनिटं उशिरानं सुरु आहे. 

आणखी एका चक्रीवादळाचा धोका.... 

क्यार आणि महा चक्रीवादळाचा धोका टळला असतानाच आता बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्री वादळ निर्माण झाल्याची माहिती आयएमडीकडून देण्यात आली आहे. बुलबुल असं या वादळाचं वादलाचं नाव आहे. हे वादळ ओडीसा राज्याच्या दिशेने येत आहे. या वादळामुळे हवामान विभागानं किनारपट्टीलगतच्या काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

सध्याच्या घडीला चक्रीवादळांचं हे सत्र पाहता देशातील आणि राज्यातील किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्याच आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.