अरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं.   

सायली पाटील | Updated: Jun 21, 2024, 10:22 AM IST
अरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...  title=
Sanjay raut on arvind kejriwal released slams ed and modi shah bjp government

Sanjay Raut News : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच तिथं देश स्तरावर एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळालं. दिल्ली कथित मद्य घोटाळ्याप्रकरणात अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान जामीनाविरोधात ईडी दिल्ली हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं जात असतानाच केजरीवालांची सुटका होणं म्हणजे ईडी आणि तत्सम यंत्रणांना ही चपराक आहे, असं परखड मत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मांडलं. 

शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधतान राऊतांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत मोदी- शाह यांच्यावर निशाणा साधला. 'मोदी आणि शाह यांनी ज्या पद्धतीनं ईडी आणि सीबीआयला हाताशी घेत लोकशाहीचं हत्यार केलं, त्यांनी किमान आतातरी समजावं की, देशातील जनतेनं मोदींविरोधात कौल दिला आहे. मोदींची हुकूमशाही नाकारली आहे. त्यामुळं त्यांना, या यंत्रणांना आता सुधरावं लागेल', असा इशारा राऊतांनी दिला. 

अरविंद केजरीवाल अद्यापही दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदी असताना अटक केली होती, पण त्यांनी राजीमाना दिलेला नाही. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन आणि दिल्लीचे इतर मंत्री आणि मुंबई, महाराष्ट्रतही ईडी आणि सीबीआयनं इतरांना अडकवलं असलं तरीही अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनं मात्र आता या यंत्रणांना चपराक लगावली आहे, असं राऊत चढ्या स्वरात म्हणाले. केजरीवालांची अटक बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयानंच दिल्याची बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली.  

 केजरीवालांकडे पूर्ण बहुमत आहे, त्यांनी मोदींना पराभूत केलं त्यामुळं  जसं मला आणि अनिल देशमुखांना अटक केली तशाच खोट्या प्रकरणांमध्ये अडकवत त्यांनाही अटक करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर केला. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News : 'बेस्ट'चा प्रवास 'इतक्या' रुपयांनी महागणार; आर्थिक कोंडीचा प्रवाशांना फटका 

 

देशात मागच्या काही दिवसांपासून लोकशाहीचा खेळ सुरू असल्याचं म्हणत ईडी, सीबीआय, पोलिसांच्या मदतीन ही कामं सुरु आहेत असं म्हणताना राऊतांनी पुन्हा एकदा 2024 मधील लोकसभा निवडणुकांच्या निकालातील पराभवाची आठवण भाजपला करून दिली. या पराभवातून आतातरी ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आणि सत्ताधारी बोध घेणार का, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.