Mumbai News : येत्या काळात मुंबईकरांना आणखी एका गोष्टीमुळं काहीशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या अडचणी आर्थिक असल्यामुळं त्या सामान्यांवरही थेच परिणाम करताना दिसणार आहेत. कारण, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टकडून तिकीट दरात वाढ केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
अर्थसहाय्य देण्यास बीएमसीनं (BMC) नकार दिल्यानं 'बेस्ट'ची आर्थिक कोंडी झाली आहे. महापालिकेनं हात झटकल्यामुळे ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी 'बेस्ट'कडे इतर कोणताही पर्याय नसल्यामुळं येत्या काळात तिकीट दरवाढ अटळ आहे. पालिका सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या किमान 5 रुपये भाड्यामध्ये येत्या काळात किमान 2 रुपये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा निवडणुकांचा माहोल आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांची वातावरणनिर्मिती या धर्तीवर ही दरवाढ लांबण्याची चिन्हं असली तरीही ती अटळ आहे हे नाकारता येत नाही. थोडक्यात बेस्टच्या या आर्थिक कोंडीचा फटका सामान्य नागरिकांच्या खिशावर बसणार आहे.
दरम्यान, 2019 मध्ये बेस्टनं पाच किलोमीटरच्या अंतरासाठी किमान भाडं 7 रुपये न ठेवता 5 रुपयांवर आणलं. एसी बससाठी किमान दर 6 रुपये ते 10 रुपये ठेवण्यात आले होते. यामुळं प्रवाशांना नोठा दिलासा मिळाला. किंबहुना प्रवाशांनी बेस्टला उत्तम प्रतिसाद दिला. बेस्टला होणाऱ्या नुकसानातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं 6 महिन्यांच्या तत्त्वावर 600 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं होतं.
आता मात्र पालिकेनंच बेस्टला आर्थिक हातभार लावण्यापासून माघार घेतल्यामुळं बेस्टच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात बेस्टकडून भाडेवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. निवडणुकीच्या दिवसांमध्ये या निर्णयाला मंजुरी मिळणं लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यामुळं आता यावर नेमका तोडगा काय? हाच प्रश्न बेस्ट प्रशासनापुढं उपस्थित झाल्यातं पाहायला मिळत आहे.