मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना चार दिवसांची ईडीची कस्टडी सुनावण्यात आली. या प्रकरणी न्यायालयात काल सुनावणी पार पडली असून गोरेगाव मधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला. दरम्यान आज सकाळी 8:30 ते 9:30 दरम्यान संजय राऊतांचे वकिल त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात येणार आहेत. आणि 9.30 नंतर ईडी त्यांच्या वकिलांसमोर चौकशी करणार आहेत.
संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत कुटुंबीयांची भांडूपला जाऊन भेट घेतली. या भेटीत ठाकरेंनी राऊत कुटुंबीयांना धीर दिला. संजय राऊत एकटे नाहीत. शिवसेना एक परिवार आहे आणि हा परिवार आपल्या पाठीशी आहेत असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी राऊत कुटुंबीयांना दिला.
मुंबईत गोरेगावातल्या पत्रा चाळ हा प्रकल्प 2008 साली सुरू करण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झालाच नाही. या जागेवरच्या लोकांना इथून हटवण्यात आलं. त्यानंतर अनेकांना भाडंही मिळत नाही. त्यामुळे एका जागेवरुन दुस-या जागेवर अशी या रहिवाशांची अक्षरशः परवड होत आहे.