Jitendra Awhad On Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तपास सुरु असतानाच शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्यामध्ये सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा मुलगा तैमूरचाच बळी जाणार होता, असं म्हटलं आहे. सुदैवाने तो यातून वाचला. मात्र नावावरुन त्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं आवाहन करताना वाल्मिक कराड आणि आपली जात सारखीच असतानाही आपण त्याला विरोध करत असल्याचं म्हटलं आहे.
"प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले. तैमूर समाज माध्यमांमध्ये जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे, 'लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!' त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव 'तैमूर' असे ठेवले," असं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे बोलताना, "तैमूर हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे. सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही," असं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आव्हाड यांनी, "तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की, सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे," असंही म्हटलं आहे.
"हल्ला करणारा कुणी ही असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला उघडा केलाच पाहिजे तो मुसलमान असेल तर त्याच्या विरोधात विचार करा तैमूर तुमचा मुलगा असता तर?" असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना, "वाल्मिक कराड माझ्या जातीतला पण मी सत्याच्या बाजूने उभा राहिलो. विचार एकच होता संतोषची बायको माझी बहीण असती तर?" असंही म्हटलं आहे. पोस्टच्या शेवटी, "हे जात धर्माचे खुळ सोडा. सत्याच्या मागे उभे रहा," असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे.
हल्ला करणारा कुणी ही असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला उघडा केलाच पाहिजे तो मुसलमान असेल तर त्याच्या विरोधात विचार करा तैमूर तुमचा मुलगा असता तर?
वाल्मिक कर्हाड माझ्या जातीतला पण मी सत्या च्या बाजूने उभा राहिलो.
विचार एकच होता संतोष ची बायको माझी बहीण असती तर ?
हे जात धर्माचे… https://t.co/SPc0i9CxVi— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2025
आव्हाड यांच्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा असल्याचं दिसत आहे.